दात आंबवणारा आंबट रस !

Sour juice

लहानपणी एक बडबड गीत ऐकले असेल – आंबट चिंबट खाऊ नका डॉक्टर कडे जाऊ नका डॉक्टर देतात सुई ऊई तमाशा ऊई ! हसू यायचे त्यावेळी. पण आंबट खायला मात्र आवडायचे. शाळेबाहेरील चिंच, बोरं, कैरी, उकळलेले आंबट गोड बोरं, करवंद आवळा कितीतरी गोष्टी अगदी सहजपणे उपलब्ध असायच्या आणि त्या खाण्याचा आनंद वर्णनातीत असायचा. आंबट पदार्थ म्हणजे काय तर ज्यामुळे तोंडात लालास्त्राव इतका वाढतो जसे काही तोंड पाण्याने धुतोय, अंगावर रोमांच येतात. डोळे आणि भुवया संकुचित होतात. आयुर्वेदाने (Ayurveda) लिहीलेली ही अम्ल रसाची लक्षणे आहेत. जे आपल्याल्याही जाणवत असतात आंबट पदार्थ खातांना बरोबर ना!

Lemon Juiceजसे गोड तिखट कडू खारट हे रस महत्त्वाचे तसेच आंबट रसही महत्त्वाचा. म्हणूनच तर ताट वाढतांना आपण चतकोर का होईना लिंबाची फोड ठेवतोच. वरणभातावर किंवा भाजीमधे लिंबू पिळतो, एकदम चव वाढते पदार्थाची. चिंचगुळाची आमटी, एखादे वेळी आमसूल घालून आमटी, कैरीच्या मोसमात डाळ कैरी असे विविध खाद्य पदार्थ आलटून पालटून आपल्या घरांमधे बनतच असतात. असा हा अम्ल रस. याचे शरीराला फायदे काय आयुर्वेद शास्त्र काय सांगते ते बघूया –

चव वाढविणारा, जठराग्नि वाढविणारा, स्निग्ध, हृदयाला हितकर, अन्नाचे पाचन करणारा, जेवणाची रुचि वाढविणारा, रक्त पित्त कफ यांना वाढविणारा आहे. शरीराचे बल वाढविणारा, मुखात लालास्त्राव करणारा, खाल्लेला पदार्थ तोंडात लालास्त्राव वाढवून आमाशयात ढकलण्यास मदत करणारा, तृप्त करणारा आहे. असे विविध गुण आंबट रसाचे आहेत.

आजकाल न्यूट्रीशन व्हॅल्यू सांगतात तर व्हिटामीन, कॅलरीज या स्वरूपात पण शरीरात पाचन झाल्यावर त्यांचे कार्य तर वर आयुर्वेदात वर्णिलेलेच आहे हे लक्षात येते. शरीराला अम्लरस असलेल्या पदार्थांची गरज का आहे तर उपरोक्त जे गुण सांगितले आहेत ते मिळावे म्हणूनच. जिभेला चव नसेल तर लिंबू आलं सैंधव चाटण उपयोगी पडते. तापेत अशक्तपणा असेल तर मोसंबी, डाळींब अशा आंबट फळाचा रस फायदेशीर ठरतो. बल वाढवितो शिवाय जिभेला चव आणतो. उन्हाळ्यात कोकम सरबत, कैरीचे पन्हे, लिंबाचे सरबत तृप्त करणारे व शक्ती देते.

अम्लरस असलेले पदार्थ कोणते –

आवळा, चिंच, लिंबू ( सर्व प्रकारचे ), कोकम, डाळींब, ताक, दही, कैरी, करवंद, बोरं, नारंगी, आंबटचुका, आसव सुरा, मदिरा, सिरका, दह्याची निवळी इ.

सर्वच अम्ल पदार्थ हे पित्त वाढविणारे असतात याला अपवाद फक्त आवळा व डाळींब आहे. हे दोनच फळ आंबट असूनही पित्त न वाढविता उलट वाढलेले पित्त कमी करणारे आहे. म्हणूनच अम्लपित्त, पित्त पडणे, शरीरात जळजळ, आग होणे अशा पित्ताच्या तक्रारींवर औषधी म्हणून याचा उपयोग होतो.

असे गुण अम्लरसात असतात. याचा अर्थ असा नाही की आंबट जास्त खाल्ले की चांगले. अति सर्वत्र वर्जयेत् असे नेहमीच म्हटल्या जाते. सतत आंबट पदार्थ जास्त खाणे हे शरीराला हानीकारक आहे. दात आंबणे, अति तहान लागणे, पित्त वाढणे, रक्तविकार, त्वचाविकार, चक्कर येणे, शरीरावर खाज सुटणे, चट्टे उत्पन्न होणे, शरीरावर सूज येणे, नेत्र रोग असे विविध विकार शरीरात निर्माण होतात. अनेक जणांना रोज आंबट चिंचेची चटणी असलेली पाणीपुरी भेळ चाटप्रकार अशी खाण्याची सवय असते. या पदार्थात लिंबू दही चिंच कैरी हे सर्वच आंबट पदार्थ एकाच डिशमधे असतात. मग हे रोजच घडत असेल तर ? शरीरात वाईट परीणाम दिसणारच. या सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे. मग वेळ येते म्हणण्याची ” आंबट चिंबट खाऊ नका …!

अम्ल रस शरीराला आवश्यकच. पण योग्य प्रमाणात घेतला तर शरीर पोषक रुचि वर्धक !

ही बातमी पण वाचा : सैंधव – आरोग्यास हितकर मीठ !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER