अजित पवारांच्या अत्यंत जवळचे दशरथ पवार यांचे कोरोनाने निधन

Dashrath Pawar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला जुन्नर येथे मोठा धक्का बसला आहे. जुन्नर पंचायत समितीचे माजी सभापती दशरथ पवार (Dashrath Pawar) (६७) यांचं कोरोनामुळे (Corona) निधन झालं आहे. चौथीच्या मुलांसाठी चावडी वाचन हा उपक्रम सुरू करणारे जिल्हा परिषद सदस्य अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा जाण्याने शोककळा पसरली आहे. दशरथ पवार हे नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचेही अध्यक्ष होते.

मागील काही दिवसांपासून ते कोरोनाशी लढा देत होते. मात्र त्यांची झुंज अपयशी ठरली. दशरथ पवार यांना मधुमेह, रक्तदाब आदी आजारही होते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर पवार हे जुन्नर तालुका पंचायत समितीचे  १९९२ ते १९९७ या दरम्यान ते सभापती होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पंचायत समितीचा पुरस्कार मिळाला होता. दशरथ पवार यांचे मूळ गाव पारुंडे. इथं भरणाऱ्या नाथपंथीय साधूंच्या कुंभमेळा समितीचे ते अध्यक्ष होते.

गावात एकोपा राहावा, यासाठी गावची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांचा नेहमी प्रयत्न असे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते सभापती व प्रगतशील शेतकरी म्हणून ते परिचित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) जुन्नरला आल्यानंतर नेहमी आमची भावकी कोठे आहे, असे म्हणत त्यांची आवर्जून चौकशी करत असत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पारुंडे व परिसरात शोककळा पसरली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER