विंडीज क्रिकेटर डरेन सामीला पाकिस्तान देणार नागरिकत्व

वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डरेन सामी याला पाकिस्तानने सन्माननीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानमध्ये ठप्प पडलेले उच्चस्तरीय क्रिकेट पुन्हा सुरु करण्यात बजावण्यात आलेल्या अतिशय महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्याला हा सन्मान देण्यात येणार आहे. पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष आरिफ अल्वी यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. याशिवाय सामी याला 23 मार्च रोजी पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान-ए-पाकिस्तानने सन्मानित करण्यात येणार आहे.

रॉस टेलरला मिळाले कोणते असे गिफ्ट की वाटावे यापेक्षा धावा काढण्या तरी सोप्या!

डरेन सामी हा पाकिस्तान सुपरलीग (पीएसएल)मध्ये पेशावर जाल्मी या संघासाठी खेळतो. या संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांनी सामीला सन्माननीय नागरिकत्वाची शिफारस केली होती. त्यानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट पुन्हा सुरु होण्यात बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने तेथील सरकारकडे याचा पाठपुरावा केला.

36 वर्षीय समी हा मुळचा वेस्ट इंडिजमधील सेंट ल्युसियाचा आहे. तो पीएसएलच्या सुरुवातीपासून पेशावर संघासाठी खेळतोय आणि दुसऱ्या सत्रापासून शाहिद आफ्रिदीने त्याच्या या संघाचे नेतृत्व सामीकडे सोपवले आहे. तेंव्हापासून सामीच्या नेतृत्वात खेळताना पेशावर जाल्मी संघाने 2017 मध्ये पेशावर जाल्मीने पीएसएलचे विजेतेपद पटकावले आणि 2018 व 19 मध्ये ते उपविजेते ठरले होते. याशिवाय पाकिस्तानात खेळण्यास तयार होणारा तो पहिला परदेशी खेळाडू आहे. पीएसएल फायनल देशात खेळवायचा पीसीबीने निर्णय घेतल्यावर सामीने ही तयारी दर्शवली होती. त्यानंतर सप्टेंबर 2017 मध्ये आयसीसीच्या विश्व एकादश संघाने तीन टी-20 सामने खेळण्यासाठी.पाकिस्तानचा दौरा केला त्यावेळी सामी हा त्या संघाचा भाग होता आणि त्याने आयसीसी संघातील इतर खेळाडूंना तेथील सुरक्षिततेबद्दल माहिती दिली होती.

याबद्दल तो म्हणतो की पीएसएल फायनलवेळचा लाहोरमधील अनुभव मी त्यांना सांगितला. आम्हाला सर्वोत्तम सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्या सुरक्षेशी संबंधीत मंडळींनीसुध्दा आयसीसी संघातील खेळाडूंना माहिती दिली होती. तो म्हणतो की सुरक्षा व बंधनांचा भाग सोडला तर मला तर मायदेशी म्हणजे सेंट ल्युसियात खेळत असल्यासारखा अनुभव आला. पाकिस्तानातील जनता जणू चांगल्या प्रकारचे क्रिकेट पाहण्यासाठी आसूसलेली होती. त्यांचे आवडते आणि आदर्श खेळाडू त्यांना खेळताना बघायचे होते. हेच मी त्या खेळाडूंना सांगितले होते.