फायर वॉल मजबूत असल्याने दापोली अर्बन हॅकिंगपासून बचावली; ४८ लाखांना गंडा घालण्याचा प्रयत्न

रत्नागिरी/प्रतिनिधी :- टेबल बँकिंग सेवेसाठी राज्यभर प्रसिद्ध असलेल्या दापोली अर्बन बँकेच्या सिस्टीममध्ये अनधिकृत प्रवेश करून 48 लाख रुपयांना गंडा घालण्याचा अज्ञात हॅकरचा प्रयत्न बँकेची फायर वॉल सिस्टीम मजबूत असल्याने व सुट्टीच्या दिवशी एनइएफटी सुविधा बंद असल्याने फसला. या घटनेची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, दापोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

रत्नागिरीतील मारूती मंदिरमध्ये नवीन शिवपुतळा उभारणार- उदय सामंत यांचा संकल्प

दापोली अर्बन बँकेच्या संगणकीय सिस्टीममध्ये शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री व रविवार दि.१६ फेब्रुवारी रोजी अज्ञात इसमाने प्रवेश करून बँकेच्या खेर्डी(ता.चिपळूण) शाखेतील बंद असलेले चालू खाते पुनर्जीवित केले. या खात्याच्या नोंदीत ३ कोटी रुपये जमा दाखविले. यानंतर या खातेदाराच्या खात्यात एक मोबाईल क्रमांक ऍड केला. या मोबाईल क्रमांकाचा वापर करून बँकेचे मोबाईल अँप. ची सुविधा त्याने स्वत:च जनरेट करून त्यानंतर देशातील विविध बँकाच्या शाखांत एनइएफटीची २४ ट्रान्झक्शन करून या सुरू केलेल्या खात्यातून सुमारे ४७ लाख ९३ हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्याचा प्रयत्न केला.

एका दिवशी एका खातेदाराला एनइएफटी करण्याची लिमिट ५ लाख रुपये असताना त्या हॅकरने हे लिमिटही क्रॅक केले. सोमवार दि.१७ फेब्रुवारी रोजी बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) शिरीष घाणेकर यांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर मोबाईल बँकिंग सुविधा व एटीएम सुविधा तात्काळ बंद करण्यात आली आहे. या सायबर हल्ल्यात बँकेचे एक रुपयाचेही नुकसान झालेले नसल्याचे बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर यांनी सांगितले असून खातेदारांना घाबरून जाऊ नये असे आवाहन जालगावकर यांनी केले आहे. दापोली पोलिसांनी या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 43 अ व 66 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करत आहेत