दानवे यांचे वक्तव्य तथ्यहीन; केंद्राने हटवादी धोरण सोडावे – अजित पवार

Raosaheb Danve-Ajit pawar

मुंबई :- कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर विरोधकांनी दानवे यांना फैलावर घेतले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दानवेंवर निशाणा साधला. ‘दानवे यांचं हे वक्तव्य तथ्यहीन आहे. शेतकरी आंदोलन करत असताना असं बोलायला नको होतं. पण ते मी असं बोललोच नाही, असं स्पष्टीकरण नंतर ते देतील, असा टोलाही अजितदादांनी (Ajit pawar)लगावला आहे.

शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारनं हटवादीपणा सोडायला हवा, असं म्हटलं. देशातील शेतकरी हा कायदा रद्द करा, अशी भूमिका मांडत आहे. यामध्ये विरोधी पक्षांना राजकारण करायचं नाही. आज थंडीच्या दिवसांत शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात राज्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले आहेत. तर मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) हे शेतकर्‍यांना घेऊन दाखल झाले आहेत, असंही पवार म्हणाले.

इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची मागणी येते त्यावेळी केंद्रानं हट्टाची भूमिका बाजूला ठेवून समंजस भूमिका घेतली पाहिजे. १०० टक्के सर्व गोष्टी आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा हे लोकशाहीत चालत नाही, याची नोंद सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे, असंही अजित पवार यांनी नमूद केलं. शेतकर्‍यांच्या पोटाला चिमटा बसल्यावरच तो रागाने रस्त्यावर येतो व आंदोलनात सहभागी होतो. जर कृषी विधेयक शेतकर्‍यांच्या फायद्याचं आहे असं केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या कृषी विधेयकाच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता, असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

शरद पवार यांनी बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या कायद्यांवर काय केलं  पाहिजे हे सविस्तर मांडलं आहे. केंद्रातील वरिष्ठ मंत्री शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत आहेत; परंतु तोडगा अजून निघत नाही. केंद्र सरकार विधेयकात काही प्रमाणात बदल करणार असल्याचे सांगत आहे. मात्र काहीही स्पष्ट केलं जात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

लसीकरणाबाबत राज्य सरकारची तयारी

कोरोनाची (Corona) लस आल्यावर लसीकरणाबाबत राज्य सरकारची तयारी योग्य पद्धतीनं सुरू आहे. आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांसोबत लष्करी जवानांनाही सर्वांत आधी लस देण्याबाबत प्रयत्न केला जाईल. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये योग्य समन्वय राखला जात आहे. ५० वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना आधी लस दिली जाईल, अशी शक्यताही अजित पवार यांनी व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : २०२४ मध्ये शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार, काँग्रेसचा प्रस्ताव?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER