दानवेंची शिवसेना आमदारासोबत एकांतात चर्चा

नांदेड : नांदेड महापालिका निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे नांदेड दौऱ्यावर असून त्यांनी कंधार-लोहा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत जवळपास तासभर एकांतात चर्चा केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रावसाहेब दानवे हे नांदेड मनपा निवडणूक संपन्न झाल्यानंतर आढावा घेण्याच्या निमित्ताने नांदेड दौऱ्यावर आहेत.

यावेळी त्यांनी शिवसेना आमदार चिखलीकर यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रावसाहेब दानवे यांच्यासोबत भाजपचे नांदेड मनपा निवडणूक प्रभारी आणि राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर, आमदार सुजितसिंह ठाकूर यांचीही उपस्थिती होती.

चिखलीकरांच्या निवासस्थानी चहापानाच्या निमित्याने या दोघांची भेट झाली. मात्र हे चहापान बंद दाराआड सुमारे तासभर सुरु होतं. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली, मात्र चर्चेचा तपशील राजकीय नव्हता असं गोलगोल उत्तर दोघांनीही दिलं.