डॅनिश चित्रपट ‘इन टू द डार्कनेस’ ठरला इफ्फी 51 ‘सुवर्ण मयूर’ पुरस्काराचा मानकरी

गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या 51 व्या इफ्फी महोत्सवाची रविवारी सांगता झाली. दुसऱ्या महायुद्धावर आधारित ‘इन टू द डार्कनेस’ या सिनेमाने सुवर्ण मयूर या अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. याशिवाय ‘द सायलेंट फॉरेस्ट’ सिनेमासाठी तैवानचे दिग्दर्शक चेन-निएन को यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा तर त्झू-चुआन लिऊ यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘आय नेव्हर क्राय’ मधील भूमिकेसाठी पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएजला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. इफ्फीच्या सांगता समारंभाला गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) उपस्थित होते. यावेळी बोलताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी, ‘सिनेमा मेंदूतून नाही तर हृदयातून येतो, इफ्फी सारखे चित्रपट महोत्सव आपल्याला जग एक असल्याची आठवण करून देतात’ असे म्हटले.

इलेक्ट्रॉनिक्स कारखान्याच्या डॅनिश मालकाला नाझी सैन्यासाठी उत्पादन करण्यास भाग पाडण्यात आले या कथानकावर आधारित सिनेमा ‘इन टू द डार्कनेस (Into the Darkness) ने समारोप झालेल्या 51व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित सुवर्ण मयूर पुरस्कार पटकावला. अँडर्स रेफन दिग्दर्शित, 152 मिनिटांच्या या डॅनिश सिनेमाने नाझींच्या ताब्यात देश असताना डेन्मार्कच्या जनतेला भोगाव्या लागलेल्या भावनिक समस्यांची गुंतागुंत उलगडून दाखवली आहे. 40 लाख रुपयांचा हा रोख पुरस्कार दिग्दर्शक अँडर्स रेफन आणि निर्माता लेने बोरग्लम यांना संयुक्तपणे विभागून देण्यात आला.

तैवानमधील दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्या चेन-नियन को यांना त्यांच्या 2020 च्या मँड्रिन भाषेतील चित्रपट ‘द सायलेंट फॉरेस्ट’ साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा रौप्य मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला. गतिमंद मुलांच्या शाळेत घडणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे वास्तववादी आणि हृदयस्पर्शी चित्रण या चित्रपटातून करण्यात आले आहे. या सिनेमात एका विशेष शाळेत नुकत्याच दाखल केलेल्या चांग चेंग या कर्णबधिराच्या नजरेतून हे कथानक मांडण्यात आले आहे. सत्यघटनेवर आधारित या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा रौप्य मयूर पुरस्कार 17 वर्षीय तझू-चुआन लियू याला प्रदान करण्यात आला. त्याने चांग चेंग या मुख्य भूमिकेतून दिव्यांग मुलाचे भावविश्व समर्थपणे उलगडून दाखविले. लियू हा ‘76 हॉरर बुक स्टोअर’ (2020) आणि ‘ऑन चिल्ड्रेन’ (2018) मधील भूमिकांसाठीही ओळखला जातो. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रौप्य मयूर पुरस्कार पोलिश अभिनेत्री झोफिया स्टॅफिएज हिला ‘आय नेव्हर क्राय’ या सिनेमातील भूमिकेसाठी घोषित करण्यात आला. परदेशातील नोकरशाहीच्या चक्रव्यूहातून स्वतःच्या वडिलांचा मृतदेह ताब्यात घेताना करावा लागणारा संघर्ष या सिनेमात मांडला आहे.

इफ्फी 51 चा विशेष ज्युरी पुरस्कार बल्गेरियन दिग्दर्शक कामिन कालेव यांच्या ‘फेब्रुवारी’ सिनेमाला देण्यात आला. विशेष उल्लेखनीय पुरस्कार भारतीय दिग्दर्शक कृपाल कलिता यांना त्यांच्या आसामी चित्रपट ‘ब्रिज’साठी प्रदान करण्यात आला. ग्रामीण आसाममधील पुरात सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचे चित्रण करण्यात आले आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण पुरस्कार ब्राझीलचे दिग्दर्शक कोसिओ परेरा डॉस सॅंटोस यांना पोर्तुगिज सिनेमा ‘व्हॅलेंटिना’साठी देण्यात आला. 17 वर्षांच्या ब्राझीलियन समलिंगी मुलीची कथा यात मांडण्यात आली आहे. आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कार हा अमीन नायफेह यांच्या ‘200 मीटर’ सिनेमाला देण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER