मेद्वेदेव फायनल हरला पण ओघवत्या भाषणाने जिंकला

Danielle Medvedev

न्यूयॉर्क :- रशियाच्या डॅनियल मेद्वेदेवने भलेही यूएस ओपनफायनल गमावली असेल पण पारितोषिक वितरण समारंभावेळी मात्र आपल्या ओघवत्या, काहीशा विनोदी आणि हजरजबाबी भाषणासह त्याने आर्थर अश स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांची मने मात्र जिंकली. सामन्यादरम्यान ज्या प्रेक्षकांनी त्याची हूर्रे उडवली होती, त्यांनीच नंतर भाषण ऐकून मेद्वेदेवसाठी टाळ्यांचा कडकडाट केला.

डॅनियल आपल्या भाषणात म्हणाला, “राफाचे अभिनंदन . 19 ग्रँड-स्लॅम स्पर्धा विजेता…अविश्वसनीय! ज्या पध्दतीने राफा खेळतोय ते पाहता खेळ तर एक जोक’च वाटतोय, तुझ्याविरुध्द खेळणे फारच अवघड आहे. ज्यावेळी त्या मोठ्या स्क्रीनवर दाखवत होते, नदालचे विजेतेपद क्रमांक 1, क्रमांक 2….क्रमांक 19…ते बघून एकावेळी तर मला वाटले की, मी जिंकलो असतो तर यांनी काय दाखवले असते? टेनिससाठी तू जे काही केलेय, कोट्यवधी मुलांना तुझा खेळ बघून टेनिसपटू बनण्याची प्रेरणा मिळतेय. अभिनंदन!”

ही बातमी पण वाचा : नदालने पाचव्यांदा जिंकल्या वर्षात दोन ग्रँड-स्लॅम स्पर्धा

सामन्यात दोन सेट व एका ब्रेकसह पिछाडीवर असतानाही सामना कसा लांबवला याबद्दल मोठे गमतीशीर उत्तर देताना तो म्हणाला, ” मला तर वाटले ठीक आहे…चला भाषणात काय बोलायचे त्याचा विचार करु या. कारण पुढच्या 20 मिनिटात आपल्याला भाषण द्यावे लागणार आहे…पण मी प्रत्येक चेंडू खेळून काढायचे ठरवले. म्हणून सामना लांबला…हो ना! दुर्देवाने तो माझ्या बाजूने आला नाही.”

या स्पर्धेच्या प्रेक्षकांशी मेद्वेदेवचे नाते फारसे सलोख्याचे नव्हते. आधीच्या सामन्यांमध्ये त्याची टिंगल उडवली गेली. संतापात मृद्वेदेवकडूनही आक्षेपार्ह हावभाव झाले आणि पारितोषिक वितरण समारंभावेळीही त्याने प्रेक्षकांवर शेरेबाजी करणे सोडले नाही. पण या शेरेबाजीने त्याने विरोधाचे कडकडाटात रुपांतर केले. तो म्हणाला, “मला तुमच्याबद्दल काही बोलायचेय. मला ठावूक आहे की आधीच्या सामन्यांवेळी मी जरा चुकीचे बोललो होतो परंतु तुम्ही मला जी काही उर्जा दिली, त्यामुळेच मी फायनलमध्ये खेळतोय.”

“आजची रात्र मला कायम लक्षात राहणारी आहे कारण टेनिसच्या दुनियेतील सर्वात मोठ्या कोर्टवर मी खेळलोय आणि तिसऱ्या सेटमध्येच मी आता काय भाषण द्यायचे याचा विचार करु लागलो होतो परंतु तुम्ही सर्वांनी मला सामना लांबविण्यासाठी प्रोत्साहित केले कारण तुम्हाला जास्तवेळ खेळ पहायचा होता म्हणून तुमच्यामुळेच मी एवढा प्रतिकार केला”.

ही बातमी पण वाचा : नदालने पाचव्यांदा जिंकल्या वर्षात दोन ग्रँड-स्लॕम स्पर्धा

डॅनियलचे हे भाषण प्रेक्षकांना फारच भावले आणि त्यांनी त्याच्या कौतुकात टाळ्यांचा कडकडाट केला.

दुसरीकडे विजेता राफेल नदाल म्हणाला की हा सामना फारच कठीण होता आणि आजचा दिवस माझ्यासाठी फारच भावनिक आणि स्मरणीय आहे. डॅनियलबद्दल बोलायचे तर यंदाचा तो बेस्ट खेळाडू आहे. मी खेळत असल्यापासून एका मोसमात त्याच्याएवढी चांगली कामगिरी मी पाहिली नाही. 23 वर्षे वयात तो जगातील चौथ्या क्रमांकाचा का खेळाडू आहे हे आपण आज पाहीले. ज्या पध्दतीने त्याने प्रतिकार केला आणि खेळाचा नूर पालटला ते विलक्षण होते. भविष्यासाठी त्याला शुभेच्छा. मला खात्री आहे की, भविष्यात त्याला भरपूर संधी मिळतील. माझ्या कारकिर्दीतील हे सर्वाधिक भावनिक क्षण आहेत. त्यासाठी येथे उपस्थित सर्वांना धन्यवाद. जगात यापेक्षा चांगले खेळाडूंना उर्जा देणारे दुसरे स्टेडियम क्वचितच असेल.