नंबर वन, टू, थ्रीला मात देत नंबर फोर ठरला चॕम्पियन, मेद्वेदेवची भन्नाट कामगिरी

लंडन : वर्षभरातील सर्वोत्तम आठ खेळाडूंच्या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील क्रमाने पहिले चार खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचले होते. त्यापैकी जो सर्वात खालच्या म्हणजे चौथ्या क्रमांकावर होता त्या खेळाडूने पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूंना मात देत एटीपी फायनल्स टेनिस ((ATP Finals Tennis) स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. रशियाच्या (Russia) दानिल मेद्वेदेवने (Daniil Medvedev) रविवारी हा इतिहास घडवला.

अंतिम सामन्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावरील आॕस्ट्रियन खेळाडू डॉमिनीक थीम (Dominic Thiem) याला 4-6, 7-6 (7-2), 6-4 अशी मात दिली आणि सलग दुसऱ्या वर्षी थीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

याच्याआधी उपांत्य सामन्यात मेद्वेदेवने दुसऱ्या क्रमांकावरील राफेल नदालला 3-6, 7-6, 6-3 असे पराभूत केले होते. तर त्याच्याआधी साखळी सामन्यात नंबर वन नोव्हाक जोकोवीचवर 6-3, 6-3 असा विजय मिळवला. याप्रकारे एकाच स्पर्धैत त्याने जोकोवीच (1), नदाल (2) आणि थिम (3) यांच्यावर विजय मिळवले. या स्पर्धेच्या 50 वर्षांच्या इतिहासात टॉप थ्री खेळाडूंना मात देत विजेतेपद पटकावणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. याशिवाय टेनिस इतिहासात कुण्या खेळाडूने एकाच स्पर्धेत नंबर 1, 2 आणि 3 च्या खेळाडूंना मात देणारा गेल्या 13 वर्षातील तो पहिलाच आणि एकूण चौथा खेळाडू ठरला आहे.

एकाच स्पर्धेत ‘टॉप थ्री’ खेळाडूंना मात देणारे टेनिसपटू असे…

1) डॉमिनीक थीम (एटीपी फायनल्स) – पराभूत : जोकोवीच, नदाल व थीम
2) डेव्हिड नालबंदीयन (माद्रिद 2007) – पराभूत : फेडरर, नदाल व जोकोवीच
3) नोव्हाक जोकोवीच (माँट्रियल 2007) – पराभूत : फेडरर, नदाल व राॕडीक
4) बोरिस बेकर (स्टॉकहोम 1994) – सॕम्रास, इव्हानसेविक, स्टीक

वच्या कामगिरीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, गेल्या वर्षी तो पहिल्यांदाच या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता. त्यावेळी त्याने तिन्ही सामने गमावले होते पण यंदा त्याने पाचही सामने जिंकले आहेत. याप्रकारे पदार्पणात सर्व सामने गमावल्यावर पुढल्याच वर्षी एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. यंदा त्याने आता सलग 10 सामने जिंकलेले आहेत.

नोव्हाक जोकोवीचनेसुध्दा 2007 मध्ये या स्पर्धेच्या पदार्पणात तीन्ही सामने गमावले होते पण पुढल्या वर्षी तो विजेता ठरला होता मात्र या विजेतेपदात एक सामना त्याने गमावला होता.

अंतिम सामन्यात पहिला सेट 6-4 असा जिंकल्यावर दुसऱ्या सेटमध्येही थीम आघाडीवर होता पण नंतर मेद्वेदेवने ओळीने 7 गूण घेत दुसरा सेट टाय ब्रेकरमध्ये जिंकला आणि शेवटचा सेट जिंकून आपल्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वात मोठे विजेतेपद पटकावले. मात्र यानंतरही हा 24 वर्षीय खेळाडू जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानीच राहणार आहे.

मेद्वेदेवच्या कारकिर्दीला ही जबरदस्त कलाटणी आहे. यंदा आॕक्टोबरपर्यंत गेल्या वर्षभरात त्याच्या नावावर टॉप टेन खेळाडूविरुध्दचा एकही विजय नव्हता पण आता महिनाभरातच त्याने टॉप टेनमधील सात खेळाडूंना मात दिली आहे.

लंडनच्या (London) ओ- टू एरिनात (O2 Arena) ही स्पर्धा खेळली जाण्याचे हे शेवटचे वर्ष होते. पुढील वर्षापासून ही स्पर्धा ट्युरीन येथे होणार आहे. योगायोगाने ओ- टू एरिनात ही स्पर्धा पहिल्यांदा खेळली गेली तेंव्हासुध्दा म्हणजे 2009 मध्ये डेव्हिडेंको या रशियन खेळाडूने ही स्पर्धा जिंकली होती. आणि आता ओ-टू चा निरोप घेतानाही रशीयन खेळाडूच विजेता ठरला आहे.

यात आणखी योगायोगाची बाब म्हणजे डेव्हिडेंको विजेता ठरला होता तेंव्हा त्याने त्यावेळचा विद्यमान युएस ओपन विजेता युआन मार्टिन डेल पोत्रो याला अंतिम सामन्यात मात दिली होती. आतासुध्दा मेद्वेदेवने मात दिलेला थीम हा विद्यमान युएस ओपन विजेता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER