डेंजरस ऑप्टिमिस्ट आणि अखंड उत्साहाचा झरा

Shailendra Paranjapeडॉ. रघुनाथ अनंत माशेलकर (Dr. Raghunath Anant Mashelkar)यांनी आज १ जानेवारीला वाढदिवस (Birthday) साजरा केला आणि वयाची ७७ वर्षे पूर्ण केली. मागच्या आठवड्यातच त्यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने एक पुरस्कार दिला गेला. वास्तविक माशेलकर सरांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी द्यायची म्हटलं तर एका लेखाइतके शब्द त्या यादीलाच लागतील.

पुण्यातले पुण्यभूषण, राज्यातले महाराष्ट्र भूषण आणि देशातला पद्मविभूषण हे मानाचे पुरस्कार तर त्यांनी मिळवले आहेतच पण त्याआधी त्यांच्या क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांनी अनेक शोधांसाठीची वैयक्तिक पेटंट्स मिळवली आहेत. त्याबरोबरच लंडनच्या रॉयल सोसायटीचे ते फेलो म्हणजे एफआरएस आहेत. अनेक परदेशी विद्यापीठात ते अभ्यागत प्रध्यापक म्हणून अध्यापनाचे काम करतात.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालकपद त्यांनी भूषवले आणि नंतर अशा देशभरातल्या चाळीसहून जास्ती प्रयोगशाळांचं जाळं असलेल्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन केंद्राचे म्हणजेच सीएसआयआरचे ते महासंचालक झाले. त्या सर्व प्रयोगशाळा आणि संशोधन संस्थांमधे त्यांनी पब्लिश ऑर पेरिश म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन करून दाखवा नाही तर चक्क थांबा, असं धाडसी पाऊल उचललं. केवळ या संस्थांमधेच नव्हे तर एकूणच देशामधे पेटंट साक्षरतेची मोहीमच त्यांनी सुरू केली. हळदीच्या जखम बरी करण्याच्या गुणधर्माचे पेटंट अमेरिकी कंपनीने घेतल्यानंतर त्याविरुद्धची कायदेशीर लढाई भारतासाठी डॉ. माशेलकर यांनी जिंकली तेव्हापासून ते भारताचे पेटंट मँन झाले. त्या पेटंटची बातमी आली तेव्हा माशेलकर सरांना सहज आठवले होते की घराच्या गच्चीवर जखमी कावळ्याला आईनं हळद लावूनच बरं केलं होतं. त्यातूनच ते देशाची पेटंटची लढाई लढले ते आणि भारतात हळदीच्या वुंड हीलिंग किंवा जखम बरी करण्याच्या गुणधर्माचे अनेक दाखले त्यांनी जुन्या लेखी वाङमय परंपरेतून सादरही केले होते.

हे सारं करतानाच नवी दिल्लीहून शनिवारी रविवारी पुण्याला येऊन पी. एचडी.च्या आपल्या विद्यार्थ्यांचे संशोधन तपासणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे, हेही त्यांनी अव्याहतपणे सुरू ठेवले. निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी रिलायन्स आणि टाटा अशा दोन समूहातून संचालक मंडळावर येता का, अशी ऑफर असणारे कदाचित माशेलकर हे एकमेव संशोधक असतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करताना टाटा ट्रस्टनं शिष्यवृत्ती दिली आणि इंग्रजी शिकवण्यासाठी एका शिक्षिकेची नेमणूक केली म्हणून माझं इंग्रजी सुधारलं. त्यामुळे टाटाची ऑफर कृतज्ञता म्हणून स्वीकारली, असं सरांनी त्या वेळी सांगितलं होतं. रिलायन्सची ऑफर स्वीकारायचं कारणंही असंच होतं. माशेलकर सरांच्या संशोधनाच्या क्षेत्राची पेट्रोकेमिकल्सची वाढ देशात होण्यात स्वर्गीय धीरुभाई अंबानी यांचं मोठंच योगदान होतं. त्यांच्याशी माशेलकर सरांचे त्या विषयाच्या अनुषंगाने स्नेहबंध होते. त्यामुळे सरांनी रिलायन्सची ऑफरही स्वीकारली. त्याशिवायही त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांमधल्या काही कंपन्यांच्या संचालक मंडळावर ते आहेत आणि त्या ठिकाणी काम करताना आपली मुळं न विसरलेले माशेलकर सर कायम समाजहितैषी भूमिकाच घेतात, याची त्यांच्या सर्व सहृदांना खात्री आहे.

सरांनी बालपण अतिशय हलखीच्या स्थितीत घालवलेलं आहे पण त्यांच्या बोलण्या वागण्यात त्याचं भांडवल करणं किंवा ते बालपण उगाळत राहणं, हे कधीच दिसत नाही. त्या बालपणीच्या कष्टांमुळे व्यक्तिमत्वात कुठे तरी कटुता येणं, हेही जाणवत नाही. उलट त्यांच्यात सतत जाणवतो तो न थकणारा त्यांचा उत्साह.

शिक्षण पूर्ण करून केमिकल इंजिनियर झाल्यावर त्यांनी नोकरी करायची इच्छा व्यक्त केली. आईचे कष्ट कमी व्हावेत, ही त्यामागची इच्छा. पण त्यांची आई अंजनी माशेलकर इतक्या भारी की त्यांनी मुलाला विचारले की आत्ता जे शिकला आहेस, त्याच्यापुढे काही तरी असेलच ना….आईनं त्यांना सतत उर्ध्वगामी असायला शिकवलं आणि त्यामुळेच माशेलकर सर सतत आणखी आणखी असं म्हणत शिकत राहिले, काम करत राहिले आणि यशाची नवनवी शिखरं सर करत राहिले.

वयाची ७७ वर्षे पूर्ण केल्यानंतरही अखंड उत्साहाचा झरा असलेले माशेलकर सर स्वतःला डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणवून घेतात. म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिसथितीतही टोकाचा आशावादी असं ते स्वतःचं वर्णन करतात. त्यांना शुभेच्छा देतानाच त्यांचा हा गुण आणि अथकपणे समाजहितैषी काम करण्याची वृत्तीही आपल्या सर्वांच्यात येवो, ही प्रार्थना.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER