लहान मुलांमधील वाढता कोरोना संसर्ग धोकादायक , उपाययोजना करा; शिवसेना खासदाराचे पंतप्रधान मोदींना पत्र

pm modi - Rahul Selwae - Maharashtra Today

मुंबई :- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत १० वर्षांखालील लहान मुलांना कोरोनाचे मोठे परिणाम पाहायला मिळाले आहे. या गंभीर समस्येकडे वेळीच लक्ष देऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी विनंती शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदींना (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पत्र लिहिले आहे. या पत्रात शेवाळे यांनी विविध राज्यांतील लहान मुलांच्या कोरोना संसर्गाची आकडेवारीही नमूद केली आहे. याद्वारे त्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे.

राहुल शेवाळे यांचे पत्र :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांच्या संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसते आहे. ‘इंडियन अकॅडमी ऑफ पेडिऍट्रीक्स’नेही लहान मुलांमधील वाढत्या संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात १ मार्च ते ४ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण ६०,६८४ लहान मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. यातील सुमारे ९,८८२ मुले पाच वर्षांखालील आहेत. मुंबई महानगर प्रदेशातील एकूण कोरोना रुग्णसंख्येच्या २० टक्के रुग्णसंख्या ही लहान मुलांची आहे.’

‘केंद्रीय आरोग्य खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील पाच  राज्यांमध्ये एकूण ७९ हजार ६८८ मुले कोरोनाबाधित झाली आहेत. छत्तीसगड, कर्नाटक, उत्तरप्रदेश आणि दिल्लीमध्ये कोरोनाबाधित लहान मुलांचा आकडा हा अनुक्रमे ५९४०, ७३२७, ३००४ आणि २७३३ इतका आहे. हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ११ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान ११ हजार ३४४ कोरोनाबाधित लहान मुले आढळून आली. यावरून भविष्यातील मोठ्या संकटाची कल्पना येऊ शकते.

आजमितीला लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस अस्तित्वात नसल्याची बाब नमूद करून खासदार शेवाळे यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘लहान मुलांमधील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका वेळीच लक्षात घेऊन देशातील तज्ज्ञ डॉक्टर्स आणि शास्त्रज्ञांच्या सल्ल्याने केंद्र आणि राज्य सरकारने वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. लहान मुलांसाठी योग्य ती औषधे, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, मास्क यांची व्यवस्था करणेही गरजेचे आहे. तसेच लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीसाठी देशभरात प्रयत्न करणाऱ्या कंपन्यांना सरकारने योग्य ते साहाय्य करावे, असे पत्रात शेवाळे यांनी नमूद केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button