
मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये अप्सरा या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही जरी लंडनची सून होणार असली तरी तिची मराठीवरची निष्ठा काही कमी झालेली नाही. नुकतेच तिने हे दाखवूनही दिले आहे की, ती मराठीवर किती प्रेम करते आणि कायम मराठीशी तिची नाळ किती जुळलेली आहे. नुकताच डान्सिंग क्वीन या रियालिटी शोचा अंतिम सोहळा संपन्न झाला आणि या मंचावर सोनाली कुलकर्णी हिने जाहीर केले की, ती कोणत्याही पुरस्कार सोहळ्यामध्ये किंवा जाहीर कार्यक्रमात हिंदी गाण्यावर नृत्य करणार नाही.
सोनालीच्या या निर्णयावर तिचे चाहते बेहद खूश झाले असून सध्या तरी तिच्या या निर्णयाची चर्चा सुरू आहे. स्टाईल, फॅशन, अभिनय, नृत्य या माध्यमातून सोनाली नेहमीच चर्चेत असते. ‘नटरंग’ या सिनेमातील ‘अप्सरा आली…’ या गाण्याने सोनाली रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिला वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नृत्य करण्याच्यादेखील ऑफर्स येऊ लागल्या. अर्थात त्यावेळी तिने अनेक गाण्यांवर नृत्य करून प्रेक्षकांची आणि चाहत्यांची वाहवा मिळवली. फेब्रुवारी महिन्यात तिने लंडनस्थित उद्योजक कुणाल बेनोडेकर याच्याशी साखरपुडा केला असून लवकरच ते विवाहबद्ध होणार आहेत. कुणाल जरी लंडनचा असला तरी सध्या व्यवसायाच्या निमित्ताने तो दुबई येथे राहतो. गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये सोनालीने कुणालसोबत काढलेले अनेक फोटो व्हायरल झाले होते. प्री-वेडिंग शूटदेखील या दोघांचं खूप गाजलं होतं.
एकीकडे सोनाली कुलकर्णी तिच्या वैयक्तिक जीवनात प्रचंड आनंदी असून सेलिब्रिटी लाइफदेखील ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी छान बनवत असते. नुकतीच सोनाली डान्सिंग क्वीन या वजनदार मुलींच्या नृत्य स्पर्धेवर आधारित रियालिटी शोची परीक्षक म्हणून छोट्या पडद्यावर दिसली होती. शिवाय ‘हास्यजत्रा’ या कॉमेडी शोची परीक्षक म्हणूनदेखील सोनाली कुलकर्णीने तिच्यामधील कॉमेडी पंचचे दर्शन घडविले होते. ‘हिरकणी’ या सिनेमासाठी सोनालीला या वर्षीचा पुरस्कारदेखील मिळाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये येऊन तिला दहा वर्षे झाल्यानंतर पहिला पुरस्कार मिळाला याचंही फार कौतुक मराठी सिनेमा इंडस्ट्रीमध्ये झालं होतं. अजिंठा या सिनेमामध्ये सोनालीने खास वेगळा लूक करून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. ‘हम्पी’ या सिनेमातील तिचा हटके लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला होता. असे सतत वेगवेगळे प्रयोग करत सोनालीचा हा अभिनयाचा प्रवास सुरू आहे. शिवाय उत्तम नर्तिका असल्यामुळे सोनालीच्या अभिनयाबरोबरच तिचा डान्स पाहण्यासाठी तिचे चाहते नेहमी आतुर असायचे.
सोनाली सांगते, गेली दहा वर्षे अभिनयासोबत माझ्या नृत्यकलेला मी नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा जाहीर प्रोग्राममध्ये मला डान्स करण्याची ऑफर देतात. अर्थात माझ्यातील नृत्यकलेसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे असे मी मानते. मात्र आपणच कुठे तरी आपल्या भाषेसाठी योग्य पाऊल उचलले पाहिजे, असं मला नेहमी वाटायचं. गेल्या काही दिवसांमध्ये मी लंडन आणि दुबई येथे गेल्यानंतर मला अनेक मराठी लोक तिथे भेटले. ते मराठीवर खूप प्रेम करतात. तेव्हा मला जाणवलं की, आपण जेव्हा आपला देश सोडतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या भाषेची किंमत असते. मात्र आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मराठी बोलायलाच अधिक लोकांना कमीपणा वाटतो ही कुठे तरी गोष्ट मला खटकत होती. मराठीबद्दल आपण जोपर्यंत स्वतः काही करणार नाही तोपर्यंत आपण इतरांनादेखील आपल्या भाषेचे महत्त्व पटवून देणार नाही, असेही माझे प्रामाणिक मत आहे.
मग मला यासाठी स्वतःपासून काय सुरुवात करता येईल असा मी विचार केला तेव्हा मी असं ठरवलं की, यापुढे पारितोषिक समारंभामध्ये, जाहीर कार्यक्रमांमध्ये मी हिंदी गाण्यावर डान्स करणार नाही असा निर्णय घेतला. आपल्या मराठीमध्ये अनेक ठसकेदार गाणी आहेत ज्याच्यावर दिलखेचक नृत्य होऊ शकते. त्यामुळे कुठे तरी मराठी गाणी प्रसिद्ध होतील आणि मराठी गाण्यांचे महत्त्व लोकांना कळेल असं मला एक कलाकार म्हणून वाटतं. काही वर्षांपूर्वी मराठी दांडिया ही संकल्पनादेखील महाराष्ट्रमध्ये खूप लोकप्रिय झाली आणि आजपर्यंत केवळ हिंदी गाण्यांवरच दांडिया नृत्य करता येतं हा समज कुठे तरी यानिमित्ताने गळून पडला.
अशा पद्धतीने जर माझ्याकडून अशी चांगली सुरुवात झाली आणि यापुढच्या काळात एखाद्या मोठ्या जाहीर कार्यक्रमांमध्ये ठसकेबाज मराठी गाण्यावर जर मी नृत्य करताना दिसले तर खऱ्या अर्थाने माझा हा निर्णय योग्य ठरला असे मला वाटेल.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला