दमदार देवेंद्र

badgeविधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत उद्धव सरकारला झोडपून काढले. ‘विदर्भ-मराठवाड्यात माणसे राहत नाही काय?’ असा रोकडा सवाल त्यांनी केला तेव्हा सभागृहात मंत्री एकमेकांकडे पाहू लागले. देवेंद्र एरवीही सुंदर आणि धारदार बोलतात. आजचे त्यांचे भाषण मास्टरपीस होते. सत्ता गेल्याच्या धक्क्यातून भाजप अजून सावरलेला नाही असे सत्ताधारी म्हणत असतात. आजच्या तोडफोड भाषणाने सत्ताधाऱ्यांचे कपडे फाटले. करोना साथरोग नियंत्रणात ठेवण्याच्या कामात सरकार कसे अपयशी ठरले त्याची चिरफाड देवेंद्र यांनी केली. देवेंद्र यांच्या नेतृत्वाची एक खासियत लक्षात आली असेल.

करोनाचे त्यांनी राजकारण केले नाही. करोनाच्या चाचण्या वाढवा असे ते सुरुवातीपासून सांगत आले. करोनामुळे गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सारेच त्रस्त आहेत. हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असली तरी रोजगार नाही, कामधंदा नाही, मार्केट उठायला तयार नाही. अशा हवेत जनतेला भडकावणे सोपे असते. पण देवेंद्र त्या मार्गाने गेले नाहीत. कित्येक वर्षानंतर महाराष्ट्राला एवढ्या उंचीचा विरोधी नेता लाभला आहे.

पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर चौफेर हल्ला केला. पुराव्यानिशी अभ्यासपूर्ण बोलत असल्याने सत्ताधाऱ्यांना निमूट ऐकावे लागले. ‘मुंबई-पुण्यापलीकडेही महाराष्ट्र आहे’ हे त्यांचे वाक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच झोंबले असणार. विदर्भ आणि मराठवाड्याला ह्या सरकारची वागणूक सापत्नभावाची होती. विदर्भात एवढा मोठा महापूर आला. चार जिल्हे बुडाले. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भात जाऊन लोकांना धीर द्यावा असे वाटले नाही. हाच पूर मुंबई-पुण्यात आला असता तर? देवेंद्र यांचे शहर म्हणून की काय, उद्धव यांनी नागपूरकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम असा झाला की , नागपुरातच नव्हे राज्यात, करोनाची आज भयावह परिस्थिती आहे. रुग्णालयांमध्ये खाटा-उपचार नाहीच. पण स्मशानभूमीतही गर्दी आहे. प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्र यांच्यात समन्वय राखण्यात सरकार कमी पडले. त्याची फळे सामान्य जनता भोगत आहे.

मार्चअखेर आपल्या राज्यात करोनाचे रुग्ण सापडू लागले. २४ मार्च रोजी फक्त २८ रुग्ण होते. आज हा आकडा ९ लाखाच्या घरात पोचला आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर देशात सर्वाधिक म्हणजे ३८ टक्का आपल्या राज्यात आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. विरोधी पक्षाला सोबत घेऊन सरकारने आपली रणनीती कार्यक्षमतेने राबवली तर करोनाला रोखू शकतो. पण सरकारची तशी इच्छाशक्ती आहे का? हा मुळात प्रश्न आहे.

करोनाशी लढायचे सोडून सरकार भलत्याच गोष्टीत ताकद लावत आहे. अभिनेता सुशान्तसिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात सुरुवातीला ह्या सरकारने बिहार पोलिसांशी पंगा घेतला. आता कंगना राणावत ह्या नटीशी खाजवणे सुरु आहे. सुशांतचा मामला मागे पडला आणि आता ‘कंगना विरुध्द सरकार’ असा संघर्ष पेटला आहे. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनकडे कंगनाने लक्ष वेधले होते. बॉलिवूडमध्ये सर्रास ड्रग चालते. पण मुंबईचे पोलीस याकडे दुर्लक्ष करतात असा तिचा आरोप आहे आणि त्यात काही दम आहे. पण शिवसेनेला त्यात मुंबई पोलिसांचा अपमान दिसतो. त्यातून संजय राऊत आपल्या नेहमीच्या तावाने बोलले. पण कंगना हे वेगळे रसायन आहे हे त्यांच्या लक्ष आलेले दिसत नाही.

उद्या कंगना मुंबईत येत आहे. राडा होणार. तिला अडवण्यासाठी रथीमहारथी भिडले आहेत. शेखर सुमन यांच्या मुलाची चार वर्षापूर्वीची मुलाखत आहे. ‘कंगना ड्रग घेते व मलाही घ्यायला आग्रह करते’ असे ह्या मुलाने त्या मुलाखतीत म्हटले होते. सेनेच्या दोन आमदारांनी त्या मुलाखतीकडे लक्ष वेधताच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीची घोषणा केली. तिकडे महापालिकेने कंगनाच्या मुंबईतल्या कार्यालावर बुलडोझर चालवण्याची तयारी केली आहे.

पण कंगना मुकी बाहुली नाही. तिला दिल्लीश्वरांचा आशीर्वाद आहे. तुम्ही लिहून ठेवा. ती विरोधकांना पाणी पाजणार. सुशांत तर वर गेला, त्याची मैत्रीण रियाला आज अटक होईल, कंगनावरून महाभारत पेटले आहे. सामान्य जनतेला हा प्रश्न सतावतो आहे की, कोणाला वाचवण्यासाठी आणि कोणाला अडकवण्यासाठी दोन महिन्यापासून ही उठापटक सुरु आहे?

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER