दलिताने बलात्कार केलेल्या पीडितेचे कुटुंब वाळीत!

rape_survivor

राजगड :- मध्यप्रदेशातील राजगड जिल्हात एका अल्पवयीन मुलीवर दलित युवकाने बलात्कार केला. त्यामुळे मुलगी अशुद्ध झाली, असे घोषित करून गावातील पंचांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांना वाळीत टाकले! पीडित मुलीच्या शुद्धीकरणासाठी भंडारा करायचा आदेश पंचांनी दिला.

याबाबतची हकीगत अशी की डंगरपुरा गावात मार्च महिन्यात एका १७ वर्षांच्या अल्पपवयीन मुलीवर गावातील दलित युवकाने बलात्कार केला. पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलिससात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

मात्र, गावातील पंचांनी सभा बोलवून बलात्कार करणारा मुलगा दलित असल्याने पीडित मुलगी अशुद्ध झाली, असे जाहीर केले. आणि मुलीच्या शुद्धीकरणासाठी गावाला अन्नदान म्हणजेच भंडारा करण्यास सांगितले.

पीडित मुलीच्या कुटुंबाची स्थिती अत्यंत हालाखीच्या आहे. हे कुटुंब भंडारा (गावजेवण) देऊ शकत नसल्याने गावाने त्याला वाळीत टाकले आहे. पीडित कुटुंबाने या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून मानवाधिकार आयोगाकडेही अशी तक्रार केली पाठवली आहे.

दरम्यान या प्रकरणी पीडित परिवाराकडून पोलिसांकडे तक्रार दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रार आली तर कारवाई करू, असे पोलिसांनी म्हटले आहे.