रोज सव्वादोन तासांचा ब्लॉक : इंद्रायणी एक्सप्रेस १ महिना रद्द

- इतर गाड्यांच्या मार्गातही बदल

indian_railway

सोलापूर : रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी भिगवण-वडशिंगे रेल्वे स्टेशनदरम्यान रोज सव्वादोन तासांचा ब्लॉक घेतला जातो त्या काळात वाहतूक राहील. इंद्रायणी एक्स्प्रेससह तीन गाड्या ३ डिसेंबर ते १ जानेवारी अशा ३० दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात असून अनेक प्रवासी गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर ते दौंडदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामांतर्गत भिगवण-वडशिंगे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी ३ डिसेंबरपासून सुमारे ३० दिवस दररोज सव्वादोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी ही साप्ताहिक (तीन दिवस) गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुणे-सोलापूर पॅसेंजर गाडी भिगवणपर्यंत धावणार आहे. तर सोलापूर-पुणे पॅसेंजर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे. हैदराबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत जाईल तर पुणे-हैदराबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे.

पुणे-सोलापूर इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्याहून सकाळी ९.३० वाजता सुटून दुपारी १.३० वाजता सोलापूर येथे पोहोचत होती़ त्यानंतर सोलापूर येथून ही रेल्वे गाडी दुपारी २ वाजता सुटून पुण्यात ६.०५ वाजता पोहोचत होती़, या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत़ गाडीचे आरक्षणही बंद करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

गाडी क्रमांक ७१४१३ पुणे-सोलापूर (डेमू) पॅसेंजर पुणे ते सोलापूर निर्धारित वेळेनुसार धावणार आहे़. गाडी क्रमांक ७१४१४ प्रमाणे सोलापूर ते कुर्डूवाडी आणि कुर्डूवाडी ते सोलापूरपर्यंत धावणार आहे़. सोलापूर रेल्वे स्थानकावरून गाडी क्रमांक ७१४१६ पुण्यापर्यंत धावणार आहे़ कुर्डूवाडी ते पुणे दरम्यान गाडी क्रमांक ७१४१५ पुणे ते कुर्डूवाडीदरम्यान धावणार नाही.

  • – गाडी क्रमांक ७१४१६ सोलापूर ते पुणे (डेमू) पॅसेंजर सोलापूर ते पुणे धावणार आहे़ त्यानंतर गाडी क्रमांक ७१४१५ पुणे ते भिगवणपर्यंत धावेल़ ही गाडी भिगवण ते पुणे गाडी क्रमांक ७१४१४ सोलापूर स्थानकापर्यंत आपल्या निर्धारित वेळेत धावणार आहे़ गाडी क्रमांक ७१४१५ भिगवण ते कुर्डूवाडीदरम्यान व ७१४१४ कुर्डूवाडी ते भिगवणदरम्यान ही गाडी धावणार नाही़
  • – गाडी क्रमांक १६५०१ अहमदाबाद-यशवंतपूर एक्स्प्रेस गाडी आठवड्यातून एक वेळा कुर्डूवाडी-दौंड सेक्शनमध्ये आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २५ मिनिटे उशिरा धावणार आहे़
  • – गाडी क्रमांक २२८८१ पुणे-भुवनेश्वर एक्स्पे्रस ही गाडी आठवड्यातून एक वेळा धावणारी कुर्डूवाडी-दौंड सेक्शनमध्ये आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २५ मिनिटे उशिरा धावणार आहे़
  • – गाडी क्रमांक २२६०२ साईनगर (शिर्डी)-चेन्नई एक्स्प्रेस ही गाडी आठवड्यातून एक वेळा वरील कालावधीत कुर्डूवाडी-दौंड सेक्शनमध्ये आपल्या निर्धारित वेळेपेक्षा २५ मिनिटे उशिरा धावणार आहे़
  • – गाडी क्रमांक ११४०६ अमरावती-पुणे एक्स्प्रेस गाडी आठवड्यातून दोन वेळा वरील कालावधीत कुर्डूवाडी-दौंड सेक्शनमध्ये आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावणार आहे़