दादा..! कोरोना हे संकट आहे, इव्हेन्ट नाही : सतेज पाटील

Chandrakant Patil - Satej Patil

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी घरात रहा, असे केलेले आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी ऐकलेले नसावे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी चर्चा करुनच कोरोना महामारीत निर्णय घेतो. व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्ह्यातील सर्व आमदारांसह सर्व लोकप्रतिनिधीशी समन्वय आहे. भाजपचा कोल्हापुरात आमदार नसल्याने पाटील यांना हे ठाऊक नाही. आतापर्यंत प्रत्येक गोष्टीत इव्हेन्ट करणाऱ्या पाटील यांना कोरोना महामारी सुध्दा इव्हेन्ट वाटत असावी. दादा..! कोरोना हा इव्हेन्ट नाही, तर संकट आहे. हे पाटील यांनी समजून घ्यावे, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.

सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्याची गरज असताना प्रशासन आणि पालकमंत्री सतेज पाटील हे ‘हम करेसो कायदा’ असे धोरण राबवत आहेत, असा आरोप आ. चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले, चंद्रकांत पाटील हे २२ मार्चनंतर दोन महिन्यांनी कोल्हापुरला आल्याने आम्ही कोरोना महामारीत केलेले काम त्यांना माहितीच नाही. व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधीशी संवाद साधत कोरोना विरोधातील लढा सुरू आहे. संचारबंदी होती. सोशलडिस्टन्सिंग पाळावे लागते अशा वेळी बैठका घ्यायच्या नसतात. हे पाटील यांना माहिती नाही का? भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सुचना केल्या आहेत. मग ते भाजपतर्फे भेटले होते की ती वैयक्तिक भेट होती.

जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा, महापालिका कर्मचारी आणि अधिकारी जीव धोक्यात घालून रात्रदिवस राबत आहेत. मुंबईनंतर सर्वाधिक स्वॅब टेस्टींग कोल्हापुरात होतात. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अलगीकरण करत कोरोनाचे सामाजिक संक्रमण रोखण्यात मोठे यश मिळविले आहे. राबणाऱ्या घटकांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे करुन चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कष्टावर पाणी फेरु नये. दोन महिन्यानंतर कोल्हापूरला दर्शन देणाऱ्या चंद्रकांत पाटील हे पुन्हा पावसाळा झाल्यानंतरच बहूतेक पुन्हा परत येतील. सध्या महिन्यांनी आल्यानंतर कोल्हापूूरकरांना काम काय दाखवायचे ? हा त्यांच्यापुढे प्रश्न असल्याने ते प्रसिध्दीसाठी रडीचा डाव खेळत आहेत. पुण्यात त्यांना प्रसिध्दी मिळत नसल्याने कोल्हापुरात येऊन टीका करुन प्रसिध्दीझोतात राहण्याचा ते प्रयत्न करतात. सत्ता गेल्याच्या धक्क्यातून चंद्रकांत पाटील आणि भाजपचे नेते अध्याप सावरलेले नाहीत. इव्हेन्टची सवय लागल्याने राज्य सरकारच्या चांगल्या कामाचा निषेध करण्यासाठी पुकारलेले आंदोलनात ड्रेसकोड लागू करत इव्हेन्टचे आयोजन केल्याचे सतेज पाटील म्हणाले.

कृपया भाकीत करु नका
कोल्हापुरला येण्यास चंद्रकांत पाटील यांनी इतका उशीर लावला. येथे आल्यानंतर आपणास क्वारंटाईन करतील, अशी त्यांना भिती असावी. म्हणून ते आले नसावेत, असे सांगून सतेज पाटील म्हणाले, आतापर्यंत विविध प्रकारचे भाकीत करण्यात चंद्रकांत पाटील यांचा हातखंडा आहे. त्यांनी केलेले भाकीत कधीही खरे होत नाही. त्यामुळे कोरोना नेमका कधी जाणार ? हे भाकीत त्यांनी चुकूनही करु नये. एकनाथ खडसे यांनी पाटील यांच्या बुडाखाली काय आहे? असे म्हटल्याप्रमाणे आपल्या बुडाखालचा अभ्यास करावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला