दाभोलकर, पानसरे हत्यांचे खटले सुरु होण्याची चिन्हे

Maharashtra Today
  • ‘सीबीआय’ व ‘एटीएसस’ने दिली माहिती

मुंबई :- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) व कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे (Govind Pansare) यांच्या हत्यांचे खटले, सध्या झाला आहे तेवढ्या तपासावर, सुरु करण्याची आमची तयारी आहे, असे अनुक्रमे केंद्रीय गुप्तचर विभाग (CBI) व महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष तपासी पथकाने (SIT) मुंबई उच्च न्यायालयास सांगितले.

या हत्यांना सात वर्षे उलटूनही अद्याप तपास पूर्ण न झाल्याबद्दल न्यायालयाकडून वारंवार वाभाडे काढले गेल्यानंतर दोन्ही तपासी यंत्रणांनी न्या संभाजी शिवाजी शिंद व न्या. मनिष पितळे ़यांच्या खंडपीठासमोर ही माहिती दिली. खटले सुरु झाले तरी या हत्यांमागील व्यापक कटाचा छडा सावण्यासाठी आणखी तपास करण्याची गरज आहे व तसा तो करण्यास आम्हाला परवानगी द्यावी, अशी विनंतीही दोन्ही तपासी यंत्रणांनी केली.

तपास संथगतीने ढिसालपणे सुरु असल्याबद्दल दाभोलकर व पानसरे यांच्या कुटुंबियांनी याचिका केल्या आहेत. ‘सीबीआय’तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग व ‘एसआयटी’तर्फे ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी केलेली वरील आशयाची निवेदने खंडपीठाने नोंदवून घेतली व कटले सुरु झाले तरी यापुढे होणार्‍या तपासावरही न्यायालयाची निगराणी कायम राहील, असे स्पष्ट केले. न्या. शिंदे म्हणाले की, तपास योग्यपणे झाला नाही अशी संका घेण्यास जराही जागा राहू नये, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही तपासावर लक्ष देत राहू व जे काही करणे आवश्यक आहे ते केले जाईल हे पाहू.

न्यायालयाने रेटा लावला म्हणून निदान ही दोन्ही प्रकरणे निदान या टप्प्यापर्यंत येऊ शकली असे सांगून दाभोलकर व पानसरे कुटुंबियांचे वकील अ‍ॅड अभय नेवगी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यावर न्या. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रासारक्या पुरोगामी राज्यास अशा हत्या भूषणावह नाही. आम्ही याच्या अगदी मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू.

दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ रोजी तर पानसरे यांची २० फेब्रुवारी, २०१५ रोजी हत्या झाली होती. गेल्या तारखेला न्यायालयाने ‘एक ना एक दिवस तपास संपायलाच हवा’, असे बजावून दोन्ही तपासी यंत्रणांना तपास नक्की केव्हा पूर्ण होणार हे सांगण्यास सांगितले होते.

अ‍ॅड. मुंदरगी यांनी ‘एसआयटी’ने केलेल्या तपासाचा ताजा प्रगती अहवाल बंद लिफाफ्यात सादर केला. आत्तापर्यंत १० आरोपींना अटक झाली आहे व दोन आरोपी फरार आहेत, असे सांगून ते म्हणाले की, प्रकरण खूप संवेदनशील असल्याने न्यायालयात याहून जास्त खुलेपणाने काही सांगता येणार नाही.

आता १५ एाप्रिल रोजी न्यायालय दोन्ही प्रकरणांचा पुन्हा आढावा घेणार आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button