दाभोलकर हत्या प्रकरण : अमोल काळेला १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी

Dabholkar

पुणे : गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल काळेला आज पुणे न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्येतील आरोपींना मदत करणे शस्त्र पुरवण्याच काम अमोल काळेने केल्याचा दावा सीबीआयने न्यायालयात केला.

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संशयित मारेकरी कळसकर आणि अंदुरे यांनी ज्या दुचाकीवरून पळ काढला. मात्र, त्या दुचाकीची व्यवस्था काळेने केली होती, अशी माहिती उघड झाली होती. तसेच, दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सचिन अंदुरेकडून जप्त करण्यात आलेली पिस्तूल अमोल काळे यानेच पुरवले असल्याची माहिती लक्षात अाली. त्यामुळे अमोल काळेचा ताबा मिळावा, यासाठी सीबीआयने प्रयत्न सुरु होते. अखेर अमोल काळेला सीबीआयने ताब्यात घेतले आणि त्याला गुरुवारी दुपारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एका बंद डायरीच्या माध्यमातून पुणे न्यायालयासमोर युक्तिवाद सादर केला. त्यामुळे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला नाही. या प्रकरणातील तपास संवेदनशील असून त्यात करण्यात आलेल्या तपासाची माहिती माध्यमांना जाऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली. त्यानुसार सीबीआयने एका बंद डायरीच्या माध्यमातून न्यायाधीश एस. ए. सय्यद यांच्या समोर युक्तिवाद सादर केला.

यावेळी सीबीआयचे वकील विनयकुमार ढाकणे म्हणाले की, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि लंकेश यांच्या हत्येतील आरोपींना अमोल काळे यांनी मदत केली आहे. कट रचणे आणि शस्त्र पुरवण्याच काम अमोल काळेने केले. त्यामुळे अमोल काळेला १४ दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनतर आरोपीचे वकील धर्मराज म्हणाले की, चौदा दिवसांची पोलीस कोठडी दिल्यास आरोपीकडे दुसऱ्याच प्रकरणांची चौकशी करण्यात येईल, त्यामुळे त्याला कमीत कमी कोठडी द्यावी, अशी मागणी धर्मराज यांनी केली.