‘तौक्ते’ चक्रीवादळ : मध्यरात्री रायगडसह मुंबईत धडकणार, उद्या मुंबईत लसीकरण नाही

Cyclone Tauktae

रायगड : अरबी समुद्रातील ‘तौक्ते’ (Tauktae) चक्रीवादळाचा (Cyclone) मुसळधार पावसासह मोठा तडाखा राज्यातील कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना बसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज मध्यरात्री तौक्ते चक्रीवादळ रायगडसह मुंबईच्या किनारपट्टी भागावर धडकणार आहे. या वादळाचा तडाखा किती असेल हे सांगता येत नसल्याने नुकसान टाळण्यासाठी रायगड किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात येत आहे. किनारपट्टीला वादळाचा तडाखा बसणार असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

तौक्ते चक्रीवादळाबाबत आज जिल्हा प्रशासनाने माहिती दिली. रात्री उशिरा तौक्ते चक्रीवादळ रायगड किनारपट्टीला धडकणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील किनारपट्टी आणि सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण तालुक्त्यातील १,६०० लोकांचे स्थलांतर करण्यात आले असून त्यांना शाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. या पार्श्वभूमिवर, वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज ठेवण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करण्यासाठी सज्ज आहेत.

वादळाबरोबरच रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. यावेळी कुणीही घराबाहेर पडू नका, असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

चक्रीवादळामुळे वाहणारे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्या मुंबईत सर्व शासकीय आणि महानगरपालिका रुग्णालयातील कोविड-१९ लसीकरण पूर्णतः बंद राहणार आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे ६० ते ८० किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो. चक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता पाहता, खबरदारीच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून उद्या लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button