‘तौक्ते’ चक्रीवादळ : नुकसानग्रस्तांना तातडीने भरघोस मदत मिळावी – देवेंद्र फडणवीस

Tauktae Cyclone - Devendra Fadnavis

रायगड : कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागातील नागरिकांना तातडीने भरघोस मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

मागच्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजूनही नुकसानग्रस्तांना मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा मोठा फटका बसला आहे. सरकारने तातडीने त्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. रायगडमध्ये जे नुकसान झालं, त्याचा आढावा आम्ही घेतला. जवळपास ८ ते १० हजार घरांचे नुकसान झाले. विशेषत: ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळी तांदूळ, इतर फळपिकांचे नुकसान झाले. जवळपास २०० शाळांचं नुकसान झालं आहे. २५ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इमारतींचं, वीज पुरवठ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही १७२ गावांमध्ये ७० हजार घरं अशी आहेत ज्यांना वीज पूर्ववत झालेली नाही. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. ४ मृत्यू या वादळामुळे रायगडमध्ये झाले आहेत. बोटींचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यांचाही पंचनामा करावा लागेल. कोळी बांधवांचं म्हणणं आहे की निसर्गवेळी झालेल्या नुकसानीचे पैसे अजून मिळाले नाहीत. आता हे दुसऱ्यांदा नुकसान झालंय. त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे, असं फडणवीस म्हणाले.

मला वाटतं की पंचनामे ही एक पद्धत असते. पण सरासरी आपल्यासमोर किती नुकसान आहे त्याचा अंदाज येतो. त्यानुसारच राज्य सरकार नुकसान भरपाईची घोषणा करत असतं. निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारने काही घोषणा केल्या होत्या. पण तीही मदत मिळालेली नाही. तेव्हा पूर्ण वाड्या उन्मळून पडल्या होत्या. त्यावेळी मदतीची अपेक्षा होती. पण ती मिळाली नाही. प्रतिझाड ५० ते १०० रुपये अशी मदत मिळाली आहे. आता हा दुसरा मोठा फटका बसला आहे. एकीकडे लॉकडाऊन, कोरोनामुळे व्यवसाय पूर्णतः ठप्प पडले आहेत. वर्षभरातच दुसरा झटका लोकांना बसला आहे. काही जिल्ह्यांनाच याचा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारवर याचा फारसा बोजादेखील पडणार नाही. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की, सरकारने भरघोस मदत करायला हवी, असं ते म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : तौक्ते चक्रीवादळ : फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यास कौकण दौऱ्यावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button