जिल्ह्यातील ५२ उमेदवारांच्या सोशल मीडियावर राहणार ‘सायबर’ वॉच

नागपूर : लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या सोशल मीडियाच्या खात्यावर नजर ठेवण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील ५५ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर होत असल्याने त्यांचे खाते रडारवर आहेत. यांच्याकडून दुष्प्रचार किंवा अपप्रचार झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे. तीन उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा उपयोग करण्यासंदर्भात रीतसर परवानगी मागितली आहे. तर इतर ५२ उमेदवारांचे सोशल मीडिया खाते रडारवर राहणार आहे.

निवडणुकीत प्रचारासाठी उमेदवारांकडून सभा, रॅली, पत्रकाचा उपयोग करण्यात येतो. मागील काही निवडणुकीपासून सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रचारासोबतच विरोधी उमेदवाराच्या दुष्प्रचारासाठीही याचा उपयोग करण्यात येतो. अनेकदा भ्रामक आणि खोटी माहितीही याच्या माध्यमातून करण्यात येते आहे. पक्षातील कार्यकर्त्यांसोबत उमेदवारांच्या खात्यातूनही हा प्रकार होत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनात आले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून अर्ज भरतानाच उमेदवारांकडून त्यांच्या सोशल मीडियावरील खात्याची माहिती घेण्यात आली आहे.

या खात्यावर वॉच ठेवण्यात येतो. याकरिता एक ‘सोशल मीडिया सेल’च तयार करण्यात आला आहे. या सेलमध्ये सायबर विभागातील अधिकाऱ्यांसोबतच सायबर तज्ज्ञाचाही समावेश आहे. या सेलमध्ये २१ कर्मचारी कार्यरत आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा जागांकरता १४६ उमेदवार रिंगणात आहे. यातील ५२ उमेदवारांकडून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रचारासाठी बल्क एसएमएसचा वापर झाल्याची बाब आढळून आली आहे. त्यामुळे या उमेदवारांच्या खात्यावर सायबर सेलची नजर आहे. या उमेदवारांची प्रत्येक पोस्ट तपासून पाहिली जात आहे. यात आचारसंहिता भंग करणारे साहित्य आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्याच प्रमाणे प्रचारासाठी सोशल मीडियाचा करण्यासाठी परवानगी देण्यासाठी आतापर्यंत केवळ तीन उमेदवारांनी अर्ज केला आहे.