CWG 2018 : राष्ट्रकुल स्पर्धेच्या भव्य उद्घाटन सोहळयाला सुरुवात

गोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाअर्थात कॉमनवेल्थ गेम्स २०१८ आजपासून सुरू होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या गोल्ड कोस्ट शहरात ही स्पर्धा भरवण्यात आली आहे. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा दिमाखात सुरू झाला आहे. राष्ट्रकुलमध्ये २३ क्रीडा प्रकारात एकूण २७५ सुवर्णपदके पटकावण्यासाठी खेळाडूंमध्ये चुरस असेल. ११ दिवस ही राष्ट्रकुल स्पर्धा चालणार आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण १८ क्रीडा प्रकारांचा (उपप्रकारांसह) समावेश होतो. त्यापैकी १४ खेळांत भारतीय खेळाडू घेणार सहभाग होणार आहे. यात जलक्रीडा, तिरंदाजी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, लॉन बोलिंग, नेटबॉल, रग्बी सेव्हन्स, स्क्वॉश, टेबल टेनिस, टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल हे क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत. या स्पर्धेत एकूण ७१ देश सहभागी होतात.

भारताकडून २२५ खेळाडूंचे पथक सहभागी होणार असून उदघाटन सोहळयाच्यावेळी पी.व्ही.सिंधू भारतीय चमूचे नेतृत्व केले . रियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारा सुशील कुमार, लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती मेरी कोम, सायना नेहवाल आणि गगन नारंगकडूनही पदकाची अपेक्षा आहे.