पंढरपूर येथे आजपासून संचारबंदी

पंढरपूर संचारबंदी

सोलापूर :- कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या १० गावांमध्ये आज मंगळवार, दि. २४ रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर (Milind Shambharkar) यांनी आज जारी केले. दरम्यान, पोलिसांनी मंदिर परिसर व चंद्रभागा नदीवरील घाट बॅरेकेडिंग करून बंद केले आहेत. पोलीस बंदोबस्तही वाढवला असून सुमारे दोन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगावदुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या १० ग्रामपंचायत हद्दीत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार १४४ अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.

कार्तिक वारी कालावधीमध्ये परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरूप परवानगी देण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंडसंहितेच्या कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER