प्रत्येक घरात असणारी गुणकारी बडीशेप / सौंफ

Fennel

बडीशेप किंवा सौंफ प्रत्येक घरात असतेच. काही पदार्थांमध्ये छान चव यावी याकरिता बडीशेप वापरली जाते. जेवणानंतर बडीशेप खाण्याची अनेकांना सवय असते. बडीशेप, जेष्ठमध, सुपारी इत्यादी मिश्रण मुखवास स्वरूपात घरात बनविल्या जाते. आहाराचे पाचन, तोंडाचा वास येऊ नये म्हणून बडीशेपेचा उपयोग होतो हे आपण जाणतोच. याशिवाय बडीशेप इतरही बाबतीत कशी उपयोगी आहे हे जाणून घेऊया.

बडीशेप : आयुर्वेदात याला मिश्रेया, मधुरा ( गोड चव असणारी), मिशि, मधुरिका, छत्रा अशी विविध पर्यायी नावे आली आहेत. मिश्रेया चवीला गोड, तिखट कडू अशी मिश्र रसाची असते. बडीशेप अथवा मिश्रेया ही थंड असते. त्यामुळे वाढलेल्या पित्ताला कमी करते. मळमळ होणे, वांती होणे अशा तक्रारींवर मिश्रेया काढा उपयोगी ठरतो.

वारंवार तहान लागत असेल तर बडीशेप गरम पाण्यात भिजवावे व थंड झाल्यावर गाळून ते पाणी प्यावे. तहान शमते व पाचनही होते. चिकट आव पडणे, उदरशूलासह संडास होणे अशा अवस्थेत पोट साफ करणाऱ्या औषधांसह बडीशेप घेतल्याने मुरडा कमी होतो व पोट साफ होते. चिकट पातळ कफयुक्त संडास होत असेल तर शेपेचा काढा किंवा चूर्ण गरम पाण्यासह घ्यावे.

पोट गच्च भरल्याप्रमाणे वाटणे, पोटात गुडगुड आवाज होणे, अजीर्ण अशा तक्रारींवर मिश्रेया खावी. लहान मुलांना, बाळांना
पोट फुगणे, उदरशूल असा त्रास बऱ्याच वेळा होतो. त्यामुळे लहान बाळ रडतात. अशा वेळी बडीशेपेचा काढा थोडा थोडा पाजावा. पोटदुखी थांबते. वायू गुदमार्गे बाहेर पडतो व शौचास साफ होते. ग्राईप वॉटरमध्ये  बडीशेपेचा अर्क वापरला  जातो

बडीशेप स्तन्यवर्धक आहे. तसेच अपचन पोट फुगणे, अजीर्ण दूर करणारी आहे. म्हणूनच सुतिकेला म्हणजेच बाळंतिणीला जेवणानंतर नियमित बडीशेप द्यावी. याचा काढा किंवा चूर्ण करून देता येतो. स्तन्य वृद्धी होते तसेच अन्नाचे पाचन होते.
बडीशेप दृष्टी शक्तीवर्धक आहे. दृष्टी चांगली राहावी. तसेच दृष्टी दौर्बल्य असेल तर बडीशेपेचा रस वापरतात.

पित्तशामक असल्याने लघवीला आग होणे, अडखळत मूत्र प्रवृत्ती होणे या विकारांवर मिश्रेया / बडीशेपेचे  भिजविलेले पाणी प्यावे. सांध्यांमध्ये  वेदना व सूज असेल तर बडीशेपेला भाजून कपड्यात पोटली बांधून अवयव शेकावा.  त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. व्रणावर, जखमेवर बडीशेपेच्या पानांचा लेप लावतात.

मासिक स्रावाच्या वेळी बऱ्याच मुलींना, स्त्रियांना पोटदुखी, कंबर दुखणे, कमी तसेच गुठळ्या स्वरूपात रक्तस्राव होणे अशा तक्रारी दिसतात.  अशा वेळी मिश्रेया ओव्याचा वापर काढ्याच्या रूपात तसेच ओटीपोट, कंबर शेकण्याकरिता करावा. अशी ही गुणकारी बडीशेप. अनेक तक्रारींवर वापरण्यात येणारी प्रत्येक घरात असणारी !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER