चेन्नईचा पराभव एन्जिडीच्या महागड्या षटकामुळे की धोनीच्या भूमिकेमुळे?

CSK loss because of Ngidi or Dhoni

शारजात (Sharjah) राजस्थान रॉयल्सने (Rajastan Royals) २१६ धावांचा डोंगर रचल्यावरही चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) २०० धावांचा पल्ला गाठला. सामना जिंकू शकणार नाही हे स्पष्ट झाल्यावर धोनी (Dhoni) व सीएसकेने चर्चा असल्याप्रमाणे नेट रनरेटचे गणित चांगले राखले पण १६ धावांनी सामना गमावला याची प्रामुख्याने दोन कारणे दिसताहेत. एक म्हणजे एन्जिडीचे (NGidi) अतिशय महागडे आणि स्वैर ठरलेले शेवटचे षटक.

दोन नोबॉल आणि एका वाईडसह तब्बल दीड षटक झालेल्या या षटकात तब्बल ३० धावा निघाल्या. जोफ्रा आर्चरने दोन्ही फ्री हिटचा लाभ उठवत सलग चार षटकार मारले. त्यामुळे दोन वैध चेंडूंतच २७ धावा निघण्याचा अविश्वसनीय विक्रम घडला आणि एक वेळ १८० च्या आत थांबेल असे वाटणाऱ्या राजस्थान रॉयल्सची धावसंख्या ७ बाद २१६ वर पोहचली. ही यूएईत खेळल्या गेलेल्या आयापीएल सामन्यांतली सर्वोच्च धावसंख्या ठरली. मात्र त्यानंतरही सीएसकेचे पराभवाचे अंतर १६ धावांचेच राहिले. यावरून हे षटक किती महागात पडले हे स्पष्टच आहे. यानंतरचा विषय आहे तो महेंद्रसिंग धोनीचा.

पहिला विषय हा की, तो सातव्या क्रमांकावर एवढ्या खाली खेळायला का आला आणि आला तर त्याने सुरुवातीला सावध खेळ का केला? शेवटच्या षटकात सामना हातातून गेल्यावर तो लागोपाठ तीन षटकार मारू शकत होता तर त्याने ते आधी का नाही मारले? धोनीचे नेमके डावपेच काय होते याच्याने सर्वच बुचकळ्यात पडले आहेत. धोनीसारखीच फाफ डुप्लेसीसने सुरुवात संथ केली होती. त्याने पहिले १८ चेंडू खेळून काढताना एकदाही चेंडू सीमापार मारला नव्हता; पण नंतर ही चूक सुधारत त्याने ३७ चेंडूंतच ७२ धावांची खेळी करून आपली चूक सुधारली; पण धोनी सुरुवातीला का आक्रमक खेळला नाही हा प्रश्नच आहे. समीकरण पाहा : धोनी खेळायला आला तेव्हा ३८ चेंडूंत १०३ धावांची गरज होती. आवश्यक रनरेट १६.२६ चा होता.

अशा वेळी शेवटच्या षटकात सामना पोहचेपर्यंत धोनीने १२ चेंडूंत फक्त नऊच धावा केल्या होत्या. त्याच वेळी समोरच्या टोकाला फाफ डू प्लेसिसने १९ चेंडूंतच ५५ धावा केल्या होत्या. म्हणून ‘द ग्रेट फिनिशर’च्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह आहे. आणि धोनी जागा झाला तेव्हा सामना हातातून गेलेला होता. ६ चेंडूंत ३८ धावांची गरज असताना त्याने लागोपाठ तीन षटकार मारले; पण काय उपयोग? फलंदाजीतला धोनीचा हा गोंधळ वेगळा आणि तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला का आला हा गोंधळ वेगळा… आकडेवारी काढली तर दिसून येईल की, याच्या आधीच्या १२ वर्षांत आयपीएलमध्ये धोनी फक्त सहा वेळा सातव्या किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.

मात्र यंदाच्या दोन्ही सामन्यांत तो सातव्या क्रमांकावर खेळायला आला. आपण एवढ्या खाली खेळायला येण्याचे समर्थन करताना धोनीने म्हटलेय की, बरेच दिवस म्हणजे तब्बल ४३७ दिवस स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेला नसल्याने त्याने खालच्या क्रमांकावर येणे पसंत केले. हा प्रदीर्घ खंड आणि १५ दिवसांचा क्वारंटाईन काळ याच्याने आपण हा निर्णय घेतला. शिवाय सॕम करन व रवींद्र जडेजासारख्या खेळाडूंनाही संधी मिळावी अशी आपली भूमिका होती, असे तो म्हणतो; पण एवढा प्रचंड अनुभव गाठीशी असताना आणि उच्च दर्जाच्या व्यावसायिक स्पर्धेत खेळताना धोनीची ही भूमिका कितपत योग्य आहे हाच आता चर्चेचा विषय झालाय. गौतम गंभीरसारख्या खेळाडूनेही धोनीचा हा निर्णय अनाकलनीय असल्याचे म्हटले आहे. धोनी या प्रयोगांचे समर्थन करताना म्हणालाय की, बऱ्याच काळात आम्ही असे केलेले नव्हते.

आता स्पर्धेची सुरुवात आहे म्हणून आम्ही हे प्रयोग करून बघत आहोत. जसजशी स्पर्धा पुढे जाईल तसतसा सिनिअर खेळाडूंवरच आमचा भर राहील आणि तेच जबाबदारी घेतील. मला वाटते की, काही गोष्टी वेगळ्या करून पाहण्याची आम्हाला ही संधी आहे. त्यात यशस्वी झालो तर ठीकच आहे आणि नाही झाले तर आमच्या पूर्वीच्या जमेच्या ज्या बाजू आहेत तिकडे आम्ही परतू शकतो. सीएसकेचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंगनेही धोनीच्या विचारांशी सहमती दर्शवली आहे. तो योग्य वेळीच फलंदाजीला आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तो खूप दिवसांनी खेळतोय म्हणून अपेक्षा पूर्ण करायला वेळ तर लागणारच. आमची फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे, असे वाटत नाही. धोनीने फलंदाजीपेक्षा पराभवाचा दोष गोलंदाजीला दिला आहे. त्याच्या मते नोबॉलसारख्या चुका टाळायला हव्यात. एन्जिडीचे नाव स्पष्टपणे न घेता तो म्हणाला की, अवांतर धावा व अवांतर चेंडू मिळाले नसते तर रॉयल्सची धावसंख्या आटोक्यात राखता आली असती. फलंदाज कसा खेळेल त्यावर तुमचे नियंत्रण नसते; पण नोबॉल टाळणे हे तुमच्या हातात असते. ते करायला हवे. त्यांना आम्ही २०० धावांपर्यंत रोखले असते तर संधी होती, असे धोनीने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER