संचारबंदीतही रस्त्यावर लोकांची गर्दी; किराणा, भाजीपाला, पेट्रोलवर लवकरच निर्बंध?

Curfew-Vijay Wadettiwar

मुंबई : राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या कमालीची वाढत चालली असल्याने १५ दिवसांच्या लॉकडाऊनला आजपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार पुढील १५ दिवस राज्यात संचारबंदी आदेश लागू असणार आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका, असा आदेश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही आज राज्यातील विविध शहरांत रस्त्यांवर, किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी बघायला मिळाली. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन आता अधिक कडक करण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार आहे.

टीव्ही-९ मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले, राज्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. लोक रस्त्यावर गर्दी करताना दिसले. नियमांचं पालन करत नसल्याची तक्रार अनेक शहरांतून येत आहे. त्यामुळे दोन दिवसांत कडक कारवाई केली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.

लोकल सेवेचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळून इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. लोकल सेवा वापराबाबत कडक निर्बंध करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी बोलणी झाल्याचंही वडेट्टीवारांनी सांगितलं. तसेच परप्रांतीय कामगारांना घरी जाण्यासाठी सूट देण्यात आली आहे. त्याचा फायदा घेऊन खासगी आणि सार्वजनिक वाहतूक केली जात आहे. आम्ही अजून एक दिवस जनतेला विनंती करतो; अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिलाय. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला आणि किराणा यांना दिलेली सूट रद्द करता येईल का? याबाबतही सरकार चाचपणी करत असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button