पीक विम्याचे पैसे द्या, अन्यथा १५ दिवसांनंतर सेनेचा मोर्चा बोलायला लागेल – उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई : संयुक्त महाराष्ट्रावेळी मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी आम्ही बांधील आहोत. आम्ही ज्यांचे अन्न खातो त्यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही. त्यामुळेच या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेनेने मुंबईत हा धडक मोर्चा काढला आहे. कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावं जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बँकाकडून मागवून घ्यावीत.

शेतकऱ्यांनी मते दिली असतील तर त्यांना न्याय देण्याचं काम केलंच पाहिजे. शेतकऱ्यांचे रखडवलेले पैसे त्यांना १५ दिवसांत परत द्या; कारण आज शांत असलेला मोर्चा १५ दिवसांनंतर बोलायला लागेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा कंपन्यांना आणि बँकांना दिला. आज मुंबईतील बीकेसी परिसरात शिवसेनेने पीक विमा कंपन्यांविरोधात मोर्चा काढला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले की, मोठमोठे लोक देशाला चुना लावून विदेशात पळून गेले आणि माझा शेतकरी देह सोडून जातो.

फसवाफसवी खूप झाली. १५ दिवसांत मला शेतकऱ्यांची कर्जमाफीची नावे बँकांच्या दरवाजावर दिसली पाहिजेत. जो शेतकरी आपलं रक्त आटवून आपल्यासाठी अन्न पिकवत असेल, आपली काळजी घेतो त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. विमा कंपन्यांनी येत्या १५ दिवसांत पैसे न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला. मुंबईत शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊन करणार काय ? असा अनेकांना प्रश्न पडला. विरोधकांनी आमच्यावर टीका करण्याआधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं हे पाहावं. मोर्च्याला नौटंकी बोलणारे नालायक आहेत.

“आमच्यावर टीका करणार्‍यांनी आधी स्वतःच्या रक्तातील भेसळ बघावी.” अशी टीका उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर केली. बीकेसीतील कार्यालये बघितली का नाही? इथे काही दिवसांनी पुन्हा यायचे आहे, असे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना सांगितले. सरकारने कर्जमाफीचे पैसे बँकाना दिले तर पैसे गेले कुठे? पीक विमा कंपनी, बँकांचे अधिकारी आणि राज्य सरकारने एकत्र येऊन बैठक घ्यावी. जी अडचण असेल त्यांनी बैठकीत मांडावी; मात्र शेतकऱ्यांची फसवणूक करू नये. हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्यांनी खाल्ले. पंतप्रधान पीक विमा योजना ही पीक विमा कंपन्यांसाठी आणली नाही तर शेतकऱ्यांसाठी आणली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला शेतकऱ्यांची जाणीव असेल तर पीक विमा कंपन्यांना का नाही? शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये येणाऱ्या काळ्या मांजराविरोधात हा मोर्चा आहे. “सरकार कोणाचंही असो, माणुसकी महत्त्वाची असते आणि माणुसकी जपणारी आम्ही लोक आहोत.” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. मुंबईत वारंवार दुर्दैवी घटना घडत आहेत.

यामध्ये नुकतीच केसरभाई इमारत कोसळली. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या. त्यातील दोषींवर कारवाई व्हायलाच हवी, अशी आमची भूमिका आहे. यातील मृतांच्या नातेवाइकांना तत्काळ नुकसान भरपाईदेखील दिली जाते. माणुसकीच्या नात्याने ती द्यायलाही हवी. मात्र, न्याय मिळत नाही म्हणून लाखो शेतकऱ्यांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत. त्याची कोणालाही काळजी नाही. त्यामुळे आम्ही पीक विमा कंपन्यांना जाग यावी यासाठी हा मार्चा काढला आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.