विराटसाठी अनुष्कावर टीका नेहमीचीच..!

VIrat Kohli & Anushka sharma

सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या ‘विरुष्का’ (Veerushka) दाम्पत्यावरील म्हणजे विराट कोहली (Virat Kohli) व अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणीसंदर्भातील वादळ आता काहीसे शमले आहे. पहिल्यांदा या टिप्पणीसंदर्भात वाऱ्याच्या वेगाने प्रसारीत झालेली काहीशी चुकीची माहिती, त्यानंतर गावसकर यांच्याबद्दल व्यक्त झालेला संताप, मग अनुष्काने दिलेले उत्तर आणि शेवटी गावसकर यांनी केलेला खुलासा असा शुक्रवारचा दिवस सामन्यापेक्षा या चर्चेनेच गाजला. मात्र सुरुवातीला गावसकर असे कसे बोलले, त्यांनी माफी मागायला हवी हा जो सूर होता तो नंतर बराच मावळला होता आणि गावसकर काही चुकीचे बोलले नाहीत येथवर गोष्ट आली. मात्र या सर्वात विराटसोबत अनुष्का शर्मासुध्दा चर्चेत आली.

तिच्या म्हणण्याप्रमाणे विराटच्या प्रत्येक अपयशात तिला गोवणे चुकीचे आहे तरी सुरुच आहे आणि भविष्यातही ते बंद होईल असे वाटत नाही. याप्रकारे विराटसंदर्भात अनुष्का नकोशा चर्चेत येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीसुध्दा तिला ‘अपशकुनी’ पासून ‘गोल्डन डक’ असे वेळोवेळी संबोधण्यात आले आहेच. खरं तर काहीदा विराटपेक्षा तीच अधिक टीकेचे लक्ष ठरली आहे.

आठवत असेल तर 2014 मध्ये इंग्लंडविरुध्द लाॕर्डस मैदानावर विराट शून्यावर बाद झाला तेंव्हासुध्दा टीकाकारांनी तिला लक्ष केले होते. त्यावेळी टीकाकार म्हणाले होते की, लाॕर्डसवर विराटकडे अनुष्काला देण्यासाठी गोल्डन डकशिवाय दुसरे काही नाही. (“A golden duck is all Virat Kohli could gift Anushka Sharma at the Lord’s”.) एवढेच नाही तर या जोडीवर बरेच जोकही झाले होते. अनुष्काच्या प्रेमात विराट एवढा बुडालाय की, मैदानावरही बुडाला असे लोक म्हणाले होते. विशेष म्हणजे आताप्रमाणे त्यावेळीसुध्दा अनुष्का इंग्लंडमध्ये विरुसोबत नव्हती.

2015 मध्येही जेंव्हा या दोघांचे प्रेमप्रकरण बहरात होते तेंव्हा वर्ल्ड कप सेमी फायनलवेळी अनुष्का विराटसाठी सिडनीत पोहोचली होती पण विराट अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्याचा दोष अनुष्काला दिला गेला. तिला अपशकुनी (Bad Omen) असे संबोधले गेले.

2018 मध्ये विरुष्का विवाहबध्द झालेले होते तरी परिस्थिती बदललेली नव्हती. जानेवारी 2018 च्या जोहान्सबर्ग कसोटीत विराट फक्त पाच धावा काढून बाद झाला तेंव्हासुध्दा अनुष्का टीकेचे लक्ष्य बनली होती. नवविवाहीत असल्याने हे जोडपे केपटाऊनमध्ये हनीमूनवर होते. केपटाऊन सामना हा या जोडप्याचा विवाहानंतर पहिला सामना होता. जोहान्सबर्गमधल्या पराभवानंतर अनुष्कावर एवढी टीका झाली की विराटला तिच्या समर्थनात समोर यावे लागले. त्यावेळी विराट म्हणाला होता की, अनुष्कावर सतत टीका करणाऱ्या लोकांना लाज वाटायला हवी. काही दया माया आहे की नाही? तिने मला नेहमीच सकारात्मक रहायला शिकवले आहे.

आयपीएल 2018 मध्ये आरसीबीचा केकेआरने पराभव केला. त्यावेळी स्टँडसमध्ये उपस्थित अनुष्काला लोकांनी दोषी ठरवले होते. वास्तविक त्यावेळी विराटने 68 धावांची खेळी केली होती.पण अनुष्काच्या उपस्थितीने केवळ विराट नाही तर पूर्ण संघाच्या खराब कामगिरीसाठी चाहत्यांनी अनुष्काला दोष दिला होता.

2016 मध्ये मध्यंतरी काही काळ विरुष्कात बिनसले होते त्यावेळी विराटची कामगिरी सुधारली त्यातही लोकांना अनुष्काच दिसली होती. पाकिस्तानविरुध्द ढाका येथे भारताने सामना जिंकला त्यामागे अनुष्काने विराटचे लक्ष विचलीत केले नव्हते हे कारण असल्याचे लोकांनी म्हटले होते.

आणि केवळ खेळापुरतीच ही टिका मर्यादीत राहिलेली नाही तर आयसीसी अधिकारी व निवडकर्ते हे विराटमुळे अनुष्काला स्पेशल ट्रीटमेंट देतात असाही आरोप काही माजी क्रिकेटपटूंनी केला होता. दिल्लीतील फिरोझशाह कोटला स्टेडियमच्या नामकरण समारंभात विराट कोहलीचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अनुष्काच्या उपस्थितीवर काही जणांनी टीका केली होती.

आत्तासुध्दा ज्या व्हायरल व्हिडिओ पोस्टवरुन गावसकरांनी काॕमेंट केली त्यासंदर्भात माजी क्रिकेटपटू समालोचक आकाश चोप्राने म्हटलेच आहे की, इतनी भी प्रायव्हसी नही है की, उनके अपार्टमेंट मे वो प्रॕक्टीस कर रहे थे तो पासवाली बिल्डींग से उसका भी व्हिडिओ ले लिया.

याप्रकारे या सेलिब्रेटी जोडीच्या प्रत्येक गोष्टीवर लोकांचे लक्ष असते आणि त्यातून कशाबद्दल वाद उत्पन्न होईल, टीका होईल त्याचा नेम नाही आणि त्यात अनुष्काचा संबंध असो वा नसो, ती ओढलीच जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER