बाऊंडरी काउंटबॅक नियमावर माजी क्रिकेटपटूंची सडकून टीका

हास्यास्पद, विचित्र, अनाकलनीय, लाजिरवाणे!

eng vs new zealand

लंडन : अतिशय अटीतटीने खेळल्या गेलेल्या विश्वचषक अंतिम सामन्याचा निकाल धावा किंवा गडी बाद होण्याने न होता चौकार-षटकारांच्या संख्येने कसा होवू शकतो, असा मुद्दा बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनी उचलला आहे. हा सामना एकदा नव्हे तर दोनदा ‘टाय’ झाला, तो काही साधा सुधा सामना नव्हता तर विश्वविजेत्याचा फैसला करणारा होता म्हणून बाऊंडरी काऊंटबॅकसारख्या नियमाने निकाल लावण्याऐवजी आयसीसीने या सामन्यातील उभय संघांना संयुक्त विश्वविजेते घोषित करणे योग्य ठरले असते असे बहुतांश माजी क्रिकेटपटूंनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : जोफ्रा आर्चरने वर्ल्डकपबद्दल चार वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी !

आयसीसीच्या या निर्णयावर गौतम गंभीर, युवराज सिंग, स्कॉट स्टायरीस, डीन जोन्स यांच्यासारख्या अनुभवी क्रिकेटपटूंनी नापसंती व्यक्त केली आहे. गंभीरने आपल्या व्टीटमध्ये म्हटलेय की एवढा महत्त्वाचा सामना चौकार-षटकारांच्या संख्येवर कसा निकाली ठरू शकते हेच समजत नाही. आयसीसीचा हा नियम निरर्थक आहे. हा सामना ‘टाय’च होता. अतिशय तोडीसतोड अंतिम सामना खेळल्यासाठी ब्लॅककॅप्स आणि इंग्लंड क्रिकेटचे माझ्याकडून अभिनंदन.

युवराजसिंगनेसुद्धा चेंडू सीमापार धाडण्याच्या आधारे विश्वविजेता ठरविला गेल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मी या नियमाशी सहमत नाही. पण नियम हे नियम आहेत. विश्वविजयासाठी इंग्लंडचे अभिनंदन मात्र शेवटपर्यंत लढणाºया किवीजची निराशा मी समजू शकतो. अप्रतिम सामना आणि अप्रतिम खेळ!

न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिस याने तर आयसीसीचा बाऊंडरी काऊंटबॅकचा नियम म्हणजे मोठा विनोदच असल्याचे म्हटले आहे. आयसीसी! छान काम, पण तुम्ही फार विनोदी आहात असे त्याने म्हटले आहे.

ऑस्ट्रेलियन आक्रमक फलंदाज व समालोचक डीन जोन्स यानेसुद्धा आयसीसीचा हा नियम अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. त्याने म्हटलेय की, डकवर्थ-लुईस-स्टर्न पध्दती ही धावा आणि गडी यांच्यावर आधारीत असतानासुद्धा बाऊंडरीजच्या आधारे निकाल लावला गेला? हे माझ्यामते तरी बरोबर नाही.

न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटूंनी तर आयसीसीच्या या नियमाचे हास्यास्पद, विचित्र, अनाकलनीय, दुर्देवी, लाजिरवाणे, असमाधानकारक असे वर्णन केले आहे. अंतिम सामना इंग्लंडने सीमापार २६ वेळा मारलेले फटके विरुध्द न्यूझीलंडचे १७ सीमापार फटके याआधारे ठरवल्याची नाराजी त्यांनी या शब्दात व्यक्त केली आहे. न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू डियान नॅश म्हणाला की मला फसवणूक झाल्यासारखे आणि रिकामे रिकामे वाटतेय. हा नियम निरर्थक आणि विचित्र आहे हे स्पष्टच आहे. नाणेफेकीच्या कौलासारखे हे अनाकलनीय आहे. परंतु तुम्ही तक्रार करु शकत नाही कारण स्पर्धेच्या सुरूवातीलाच हे नियम ठरले आहेत. पण ज्यांनी अधिकाधिक गडी बाद केले ते का विचारात घेतले जाऊ नये मला कळत नाही. कित्येक वर्षांपासून गडी बाद होण्यावर क्रिकेटचे सामने निकाली ठरत आले आहेत मग आताच का त्यात बदल केला गेला असा सवालही नॅशने केला आहे.

२०१५ च्या उपविजेत्या किवी संघाचा सदस्य कायले मिल्स म्हणाला की माझ्यामते क्रिकेटचा खेळ हा धावांचा आणि गडी बाद करण्याचा आहे. त्यामुळे ज्यावेळी धावा सारख्याच होत असतील त्यावेळी किती गडी बाद झाले हाच निकष असायला नको का? या नियमांबद्दल आपण तक्रार करू शकत नाही हे दुर्देव!

न्यूझीलंडने सरस नेट रनरेटआधारे उपांत्य फेरी गाठली होती. त्याठिकाणी प्रतिस्पर्धी संघांवरील विजयांचा निकष लावला असता तर किवीजचा संघ साखळीतच बाद झाला असता याकडे त्याने लक्ष वेधले.

न्यूझीलंडचा माजी कर्णधार जेरेमी कोनी याने हे दोन्ही नियम बदलण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. संयुक्त विजेते घोषित करण्यात काहीच चूक नव्हती असेही त्याने म्हटले आहे. आणि जर षटकार-चौकार हा निकष होऊ शकतो तर निर्धाव चेंडृू हासुद्धा निकष होऊ शकतो असे त्याने म्हटले आहे. माजी यष्टीरक्षक पीटर मॅक़ग्लाशन यानेसुद्धा बाऊंडरी काउंटबॅक़ नियमावर नाराजी व्यक्त केली आहे. ४८ सामने खेळल्यानंतर अंतिम सामन्याचा निकाल जर खेळापेक्षा कागदावर होत असेल तर ते लाजिरवाणे आहे असे त्याने म्हटले आहे.त्याने तर सुपर ओव्हर ही सकल्पनाच रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याऐवजी संघांचा निर्र्धारीत ५० षटकांअंती खेळ जिथे थांबला तिथून पुढे सुपर ओव्हरचा खेळ व्हायला हवा आणि अंतिम सामन्यात तर इंग्लंडचा संघ सर्वबाद झालेला होता त्यामुळे ते सुपर ओव्हर खेळूच शकत नव्हते म्हणून त्यांचा पराभवच जाहीर करायला हवा होता असे त्याने म्हटले आहे.