‘लक्ष्मी’ फ्लॉप झाल्याने अक्षयच्या पुढील चित्रपटांवर घोंघावतेय संकट!

Akshay Kumar - Laxmii

दक्षिणेतील सुपरहिट चित्रपट ‘कंचना’ (Kanchana) ची हिंदी रिमेक ‘लक्ष्मी’ (Laxmii) या नावाने मोठ्या पडद्यासाठी तयार करण्यात आली. यात अक्षयकुमारने (Akshay Kumar) तृतियपंथिय भुताची भूमिका साकारली. मात्र कोरोनामुळे (Corona) चित्रपटगृहे बंद झाली आणि चित्रपट मोठ्या पडद्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. अक्षयकुमार सातत्याने हिट चित्रपट देत असल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मने याला मोठी रक्कम दिली होती. या चित्रपटाने वादही निर्माण केला, त्यानंतर नावही बदलण्यात आले. आणि प्रचंड प्रचारही करण्यात आला.

प्रेक्षकांनी मोठ्या उत्सुकतेने ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहिला आणि त्यांचा भ्रमनिरास झाला. अक्षयचा चित्रपट इतका वाईट कसा असू शकतो असाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उभा राहिला. हिंदीत रिमेक करताना त्यात खूप हस्तक्षेप होत असल्यानेच दिग्दर्शक राघव लॉरेन्सने चित्रपट सुरुवातीलाच सोडला होता. राघवनेच मूळ चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते. चित्रपट पाहिल्यानंतर कळते की, राघवने सुरुवातीला का नकार दिला असावा. मात्र अक्षयची इमेज असल्याने या चित्रपटाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर विक्रम केला. सुशांत सिंहच्या ‘दिल बेचारा’पेक्षाही जास्त प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला. त्यांनी चित्रपट पाहिला खरा पण शिव्या देऊ लागले. समीक्षकांनीही या चित्रपटाला चांगलेच झोडपले.

‘तीस मार खां’, ‘अॅक्शन रिप्ले’, ‘जोकर’ असे काही चित्रपट सुपरफ्लॉप झाले आहेत. मात्र गेल्या काही वर्षात त्याचा यशाचा ग्राफ चढता असल्याने ‘लक्ष्मी’कडूनही खूप अपेक्षा होत्या. परंतु आता लक्ष्मीला सगळ्यांनी झोडल्यामुळे अक्षयच्या आगामी चित्रपटांवर संकटाचे वादळ घोंघावू लागले आहे. अक्षयवर टीका करणारे मीम्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. निर्माता आणि वितरक आता अक्षयच्या चित्रपटांबाबत साशंक झाले आहेत.

पुढील वर्षीच्या पहिल्याच दोन-तीन महिन्यात अक्षयचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. खरे तर हा चित्रपट यावर्षीच प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे तो लटकला आणि आता तर प्रेक्षकांनाही त्याच्याबाबत फार उत्सुकता दिसत नाही. लॉकडाऊननंतर अक्षयनेच सर्वप्रथम शूटिंग सुरु केले. मात्र तो त्यासाठी मुंबईत राहिला नाही तर स्कॉटलँडला गेला आणि ‘बेलबॉटम’ चित्रपटाचे शूटिंग केले. त्यानंतर त्याने आता यशराजच्या ‘पृथ्वीराज’चे काम सुरु केले आहे. आनंद एल. रायच्या ‘अतरंगी रे’चेही शूटिंग याच वर्षी पूर्ण करण्याचा त्याचा विचार आहे. तसेच त्याच्यात रक्षाबंधनचेही शूटिंग तो पुढील वर्षी सुरु करणार आहे. तसेच पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये त्याला ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचे शूटिंग करायचे आहे.

वर्षाला तीन-चार चित्रपट देणाऱ्या अक्षयकडे आता आठ-दहा चित्रपट असल्याने त्याच्या चित्रपटांचा दर्जा कसा असेल असा प्रश्न निर्मात्यांना पडला आहे. अक्षयकुमार पूर्वी असेच भरमसाट चित्रपट करायचा आणि ते फ्लॉप व्हायचे. तोच काळ आता पुन्हा आला की का अशी शंका बॉलिवूडमध्ये व्यक्त केली जात आहे. एकूणच अक्षयच्या आगामी चित्रपटांना ‘लक्ष्मी’ने धोक्याच्या पायरीवर नेऊन ठेवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER