महाविकास आघाडीला धक्का; शपथविधीला मित्रपक्षांचा बहिष्कार

Mahavikas aghadi

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. सोमवारी (३० डिसेंबर) म्हणजे आज दुपारी १ वाजता विधानभवनाच्या परिसरात मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मात्र या मंत्रिमंडळ विस्ताराला महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मित्रपक्षांच्या नेत्यांनी याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. ‘मित्रपक्षातील कोणत्याही नेत्याला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही.

भावाचं नाव वगळल्यानं मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार संजय राऊत नाराज?

त्यामुळे या सोहळ्याला आम्ही उपस्थित राहणार नाही. आगामी काळात होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आम्ही हा मुद्दा उपस्थित करू.’ अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. तर दुसरीकडे, शेकापचे नेते जयंत पाटील हेदेखील नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मित्रपक्षांना मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद तर नाहीच; पण या सोहळ्याचं निमंत्रणही देण्यात न आल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रातील आगामी राजकारणावरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.