कॉपीराईट, ट्रेडमार्क कायद्याखालील गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र

Mumbai High Court
  • मुंबई हायकोर्टाने केले स्पष्टिकरण

मुंबई : ज्यासाठी तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते असे कॉपीराइट कायदा (कलम ६३) व ट्रेडमार्क कायदा (कम १०३) याखालील गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र आहेत आणि अशा गुन्ह्यांमधील आरोपी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतो, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

सोलापूर जिल्ह्याचील मोहोळ पोलीस ठाण्याचे नोंदविलेल्या सी. आर. क्र. ८६५/२०२०मधील एक आरोपी पियुष सुभाषभाई राणिपा याने केलेल्या अटकपूर्व जामिनावरील निकालात न्या. सारंग कोतवाल यांनी हा खुलासा केला. आरोपी गुजरातमधील रिबडा येथील टेराप्लो या प्लॅस्टिक पाईप बनविणाºया कंपनीचा मालक आहे.  बाजारात आपल्या कंपनीच्या नावाचे व ट्रेडमार्कचे लेबल लावून निकृष्ठ दर्जाचा माल विकला जातो, अशी खबर शेताला पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाºया दर्जेदार पाईप्सचे उत्पादन करणाºया जैन इरिगेशन या कंपनीस लागली होती.

त्यानुसार पाळत ठेवली असता जैन कंपनीचे झोनल मॅनेजर प्रकाश गोरे यांना जैन कंपनीचे बनावट नाव लावलेले प्लॅस्टिक पाईप गुजरातहून कर्नाटकला नेणारा एक ट्रक आढळला. गेल्या १९ डिसेंबर रोजी पोलिसांच्या मदतीने तो ट्रक व त्यालील माल जप्त केला गेला. ट्रकमधील बनावट पाईप राणिपा यांच्या कंपनीने बनविलेले होते त्यामुळे भादंविखेरीज कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्यान्वये त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

राणिपा यांनी केलेल्या अटकपूर्व अर्जावर विचार करण्याआधी कॉपीराईट व ट्रेडमार्क कायद्याकालील संबंधित गुन्हे हे दखलपात्र व जामीनपात्र आहेत का, असा मुद्दा उपस्थित झाला. त्याची उकल करण्यासाठी न्या. कोतवाल यांनी अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनाही मदतीची विनंती केली. राणिपा यांचे वकील मंदार सोमण, अनिकेत निकम व अतिरिक्त पब्लिक प्रॉसिक्युटर अजय पाटील यांचे म्हणणे ऐकून आणि विविध न्यायालयांनी याआधी दिलेले निकाल विचारात घेऊन न्या. कोतवाल यांनी वरीलप्रमाणे निर्वाळा दिला. नंतर त्यांनी राणिपा यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर गुणवत्तेवर विचार केला व तो फेटाळला.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER