न्यायाधीशांच्या बदनामीबद्दल १७ व्यक्तींविरुद्ध नोंदले गुन्हे

सोशल मीडियातील पोस्टवरून ‘सीबीआय’ची कारवाई

CBI

हैदराबाद :- आंध्र प्रदेश उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध समाजमाध्यमांतून बदनामीकारक वक्तव्ये प्रसारित केल्याबद्दल केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) राज्यभरातील १७ व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. हे सर्वजण सत्ताधारी वायएसआर काँग्रेसेचे राज्य व जिल्हा पातळीवरील नेते आहेत.

या लोकांनी गेल्या एप्रिलपासून समाजमाध्यमांत टाकलेल्या पोस्टबद्दल आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या महाप्रबंधकांनी (Regitrar General) राज्य ‘सीआयडी’कडे एकू़न १२ फिर्यादी दाखल केल्या होत्या. परंतु त्यावर काहीच कारवाई झली नाही  म्हणून हायकोर्ट प्रशासनाने स्वत:च्याच न्यायिक बाजूकडे रिट याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने या सर्व फिर्यादींचा तपास ‘सीबीआय’कडे वर्ग करण्याचा आदेश दिला होता.

ही बातमी पण वाचा : गुन्हेगारांना निवडणूक बंदीचा आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

त्यानुसार ‘सीबीआय’ने या सर्व १२ फिर्यादी एकत्रित करून तपास सुरु केला. त्याची पहिली पायरी म्हणून आरोपींविरुद्ध भादंवि कलम १५३ए, ५०४, ५०५(२) आणि ५०६ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम, ६७ अन्वये गुन्हे नोंदले. ज्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवले गेले त्यांत कोंडारेड्डी धामीरेड्डी, मणी अण्णपू रेड्डी, शिवा रेड्डी, श्रीधर रेड्डी अवथू, जलगम व्यंकट सत्यनारायण, जी. श्रीधर रेड्डी, लिंगा रेड्डी, चंदू रेड्डी, श्रीनाथ सुस्वरम, किशोर रेड्डी दरिसा, चिरंजीवी रेड्डी, लिंगारेड्डी राजशेखर आणि के. गौतमी.

न्यायाधीशांवर अशाच प्रकारे पक्षपात व वशिलेबाजीचे आरोप करणारे पत्र मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांनी सरन्यायाधीश न्या. बोबडे यांना लिहिले होते. त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका दाखल झाल्या आहेत. सोमवारी न्या. उदय लळित यांनी या याचिकांची सुनावणी करण्यास नकार दिल्याने आता त्या याचिका सुनावणीसाठी अन्य एखाद्या खंडपीठापुढे जातील.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER