भीमा कोरेगाव, मराठा आणि शेतकरी आंदोलनादरम्यानचे तरुणांवरील गुन्हे मागे : गृहमंत्री

Anil Deshmukh

मुंबई : भीमा कोरेगाव, मराठा आरक्षम आंदोलन आणि शेतकरी आंदोलन यासारख्या राज्यातील विविध आंदोलनादरम्यन गुन्हे दाखल करण्यात आलेल्या तरूणाच्याविरुद्ध लागू करण्यात आलेले गुन्हे मागे घेतल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. भीमा कोरेगाव प्रकरणातील 348, तर मराठा आंदोलनातील 460 गुन्हे मागे घेण्यात आले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यानी दिली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचे गृहमंत्री म्हणाले.

मागील सरकारच्या काळात राज्यभरात अनेक आंदोलने झालीत. शेतमालाला योग्य भाव देण्यासाठी शेतक-यांचे आंदोलन, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान ऐतिहासिक मोर्चे काढण्यात आले. शिवाय शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळला होता. या सर्व आंदोलनादरम्यान आक्रमक झालेल्या अनेक तरूणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील काही गुन्हे मागे घेण्याचा निर्णय आता राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलनात नियमाच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीत राहून शासकीय मालमत्तेचे नुकसान केले नाही, असे गुन्हे मागे घेणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरे आंदोलन आणि नाणार प्रकल्पाविरोधात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. त्यानंतर आता मराठा आंदोलक आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.