भांडुप रुग्णालय जळीत प्रकरण : राकेश वाधवानसह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल

Bhandup hospital burning case Maharashtra Today

मुंबई :- भांडुपमधील ड्रीम मॉलमधील सनराईज कोव्हिड रुग्णालयाच्या लागलेल्या आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेचे चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले होते. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रीम्स मॉल मॅनेजमेंटमधील एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवानसह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भांडुप पोलिस ठाण्यात राकेश वाधवान यांच्यासह अन्य काही जणांविरोधात कलम ३०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार या प्रकरणात ड्रीम्स मॉल मॅनेजमेंटमधील राकेश वाधवान, निकिता त्रेहान (राकेश वाधवान यांची मुलगी), सारंग वाधवान (राकेश वाधवान यांचे भाऊ), दीपक शिर्के आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सनराईज ग्रुप मॅनेजमेंटमधील प्रिविलेज हेल्थकेयरच्या अमित त्रेहान (राकेश वाधवान यांचा जावई), निकिता त्रेहान (राकेश वाधवान यांची मुलगी) आणि स्वीटी जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हा ड्रीम्स मॉल वाधवान याच्या कंपनीने २००९ मध्ये बनवला आहे. राकेश वाधवान यांची मुलगी निकिता त्रेहान सनराईज ग्रुपची संचालिका आहे. ज्यांचं हॉस्पिटल ड्रीम्स मॉलमध्ये होतं. कोविड काळात अटीशर्तींसह त्यांना कोविड रूग्णालय बनवण्याची परवानगी ३१ मार्चपर्यंत मिळाली होती. या प्रकरणातील राकेश वाधवान, सारंग वाधवान हे एचडीआयएल प्रकरणात आणि HDIL पीएमसी बॅंक घोटाळ्यात आरोपी आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊन काळात वाधवान यांचा परिवार महाबळेश्वरला गेला होता. या प्रकरणात गृह विभागाच्या तत्कालीन सचिवांनी दिलेल्या पत्रावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER