
मुंबई : भाजपा नेत्या चित्रा वाघ मॉर्फप्रकरणी सायबर गुन्हे विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांच्या भेटीला गेल्या. फोटो मॉर्फिंगप्रकरणी वाघ यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल केली.
राठोडांसह फोटोचे मॉर्फिंग
चित्रा वाघ यांनी बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन फोटो मॉर्फिंगप्रकरणी रितसर तक्रार दाखल केली. वाघ यांचे मॉर्फ केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. त्या फोटोमध्ये चित्रा वाघ आणि वनमंत्री संजय राठोड एकमेकांच्या जवळ उभे असल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात चित्रा वाघ आणि त्यांचे पती किशोर वाघ यांचा जुना फोटो मॉर्फ करण्यात आला होता. चित्रा वाघ यांनी त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही कल्पना आहे. आता याप्रकरणात मुंबई पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.
मॉर्फ केलेल्या फोटोवर चित्रा यांची प्रतिक्रिया?
“माझे खासगी फोटो काढून मॉर्फ करून तुम्ही काय साध्य करणार आहात? किंवा तुम्हाला काय साध्य करायचे? मिनिटा मिनिटाला फोन करून मला त्रास दिला जातो आहे. मला काम करता येत नाही आहे. सीजींपासून डीजीपर्यंत सर्वांना फोटो पाठवले आहेत. इतका त्रास देण्याचे काय कारण आहे? तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण पूजाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही बोलतच राहणार. तुम्ही मला कितीही त्रास द्या, माझे फोटो मॉर्फ करून व्हायरल केले, तरीही मला काहीच फरक पडणार नाही. मी माझा लढा चालूच ठेवणार आहे.” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी त्याचा फोटो मॉर्फ करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
फडणवीस नेमके काय म्हणाले?
“सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण आंदोलन करणार्या महिलांचेच अटकसत्र राबविण्यात शासनाला धन्यता वाटते. भाजपाच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणार्या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही निषेध करतो.” असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला