औरंगाबाद : महिला अधिकाऱ्याशी अश्लील वर्तन; निलंबित आरोग्य अधिकाऱ्यावर गुन्हा

औरंगाबाद : दारू व रकमेची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले निलंबित जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल रामभाऊ गिते (४४) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अश्लील वर्तणूक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार गितेंविराेधात त्यांच्याच साेबत काम करणाऱ्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने रविवारी दाखल केली आहे.

सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गितेंकडून वारंवार आपला पाठलाग करणे, अपमानास्पद बाेलण्याची कृती झाल्याची तक्रार या ४३ वर्षीय महिलेने दिली आहे. ९ जुलै रोजी गिते याने सदर महिलेला संध्याकाळी वारंवार कॉल केले. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर त्याने या महिलेच्या डाॅक्टर पतीच्या मोबाइलवर कॉल करणे सुरू केले. पतीने कॉल रिसिव्ह केले असता त्यांच्याकडे या महिलेविषयी अश्लील बोलून जिवे मारण्याची धमकी दिली. रात्री ११ वाजता पुन्हा कॉल करून महिलेला त्रास दिला. वरिष्ठ असल्याचा गैरफायदा घेऊन गिते मागील वर्षभरापासून हा प्रकार करत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून गितेंविराेधात कलम ३५४ (ड) (अ)(४) नुसार गुन्हा दाखल झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER