क्रिकेट आॕलिम्पिकच्या वाटेवर, टी-10 करेल मार्ग सोपा

Maharashtra Today

क्रिकेटच्या (Cricket) आॕलिम्पिकमध्ये (Olympic) समावेशाच्या शक्यता वाढल्या असून टी-10 प्रकारच्या सामन्यांनी क्रिकेटसाठी आॕलिम्पिकचे दरवाजे उघडू शकतात. सन 1900 पासून क्रिकेट आॕलिम्पिकच्या बाहेरच आहे पण आता 2028 च्या लाॕस एंजेल्स (Los Angeles) आॕलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळले जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत प्रभाव राखणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ व इंग्लंड क्रिकेट मंडळाने यात स्वारस्य दाखवले आहे. त्यामुळे या शक्यता वाढल्या आहेत. या दोन मंडळांनाच आधी याबाबत काही शंका होत्या.

इसीबीचे मुख्याधिकारी टाॕम हॕरिसन यांनी आयसीसीने आयोजित केलेल्या मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत हा विषय मांडला तेंव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे समजते.

आयसीसीच्या या बैठकीनंतर बीसीसीआयच्या अॕपेक्स कौन्सिलची बैठक झाली. त्यातही क्रिकेटच्या आॕलिम्पिकमधील समावेशाला सशर्त पाठिंबा देण्यात आला. याच्याआधी भारतीय आॕलिम्पिक समितीच्या छताखाली येण्यास बीसीसीआयचा विरोध होता. परंतु आता क्रिकेटवरील त्यांची सत्ता बाधीत होणार नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने बीसीसीआयचा विरोध आता मावळला आहे आणि उलट भारत लाॕस एंजेल्स आॕलिम्पिकसाठी आपला क्रिकेटचा संघ पाठवेल अशी तयारी त्यांनी दाखवली आहे.

आॕलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने कशा स्वरुपात होतील हे अद्याप स्पष्ट नसले तरी टी-10 प्रकाराला वाढता पाठिंबा आहे. 10 दिवसातच आॕलिम्पिक क्रिकेटची स्पर्धा संपवायची असल्याने कमीत कमी खेळपट्ट्यांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी हाच प्रकार योग्य ठरेल याबद्दल बहुमत आहे. टी- 10 चा सामना साधारणतः 90 मिनिटातच संपतो. इसीबी हंड्रेड बॉलची पध्दतही सुचवू शकते तर काहींच्या मते टी-20 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा टी-10 च्या रुपाने आणखी चौथा प्रकार आला तर क्रिकेटचे अवमुल्यन होईल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या नियमानुसार कोणत्याही खेळाचे जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त स्वरुप असेल तरच त्या खेळाला आॕलिम्पिकमध्ये स्थान मिळते. पण आयसीसीची अशी टी-10 ची कोणतीही स्पर्धा नसल्याने आता अबुधाबीत टी-10 ची स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत क्रिकेटचा 2028 च्या आॕलिम्पिकमध्ये समावेशाची शक्यता मानली जात आहे पण 2032 च्या आॕलिम्पिकमध्ये क्रीकेटचा समावेश जवळपास निश्चित मानला जात आहे.

क्रिकेटच्या समावेशाने आॕलिम्पिक चळवळीलासुध्दा फायदा होणार आहे कारण दक्षिण आशियात आॕलिम्पिकच्या स्पर्धांना तेवढे दर्शक लाभत नाहीत पण दक्षिण आशियात क्रिकेट खूपच लोकप्रिय असल्याने त्याचा फायदा आॕलिम्पिकला अधिकाधिक दर्शक मिळण्यास होवू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button