ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशाची शक्यता वाढली

2028 Olympics LA - BCCI

टी-20 (T-20 cricket) सामने आल्यापासून क्रिकेटची व्यापकता आता वाढली असून जगभरात हा खेळ पोहचला आहे. कॕनडा (Canada), जर्मनी, फिनलँड, स्पेन (Spain), मेक्सिको, जपान (Japan) ब्राझीलसारख्या देशांचे संघ आता टी-20 क्रिकेट खेळू लागले आहे. शिवाय टी-20 मुळे क्रिकेटचा सामनासुध्दा साडेतीन तासात आटोपत आहे. अलीकडच्या या बदलामुळे नजिकच्या भविष्यात क्रिकेटच्या ऑलिम्पिकमध्ये (Olympic) समावेशाच्या आशा वाढल्या आहेत. 2028 मध्ये लॉस एंजेल्स (Los Angeles 2028) येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश केला जावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी ICC) ने त्यासाठी जोर लावला आहे.

आयसीसीच्या या प्रयत्नात अलीकडेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतलेल्या एका निर्णयाने बळ मिळाले आहे. बीसीसीआयने आता उत्तेजक द्रव विरोधी चाचणीसाठी सहमती दर्शवली आहे. त्यासाठी बीसीसीआयने गेल्यावर्षीच नॕशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) च्या कार्यकक्षेत येण्यास सहमती दिली आहे. त्यामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाच्या मार्गातील फार मोठा अडसर दूर झाला आहे.

क्रिकेट जगतात हल्ली बीसीसीआय हे सर्वात प्रभावी मंडळ आहे आणि क्रिकेटचे बरेच अर्थकारण बीसीसीआयवर अवलंबून आहे. मात्र गेली बरेच वर्षे बीसीसीआयचा अँटी डोपिंग एजन्सीच्या कार्यकक्षेत येण्याला विरोध होता. जागतिक अँटी डोपिंग एजन्सी (WADA) च्या व्हेअरअबाउटस् नियमाला बीसीसीआयचा विरोध होता. व्हेअर अबाउटस नियमानुसार खेळाडूंना ते कुठे असणार याची माहितीद्यावी लागते आणि अचानक भेटी देणाऱ्या पथकासमोर चाचणीसाठी उपलब्ध रहावे लागते. परंतु आता बीसीसीआय नाडा’च्या कार्यकक्षेत आल्याने हा प्रश्न मिटला आहे. मात्र अजुनही दरवेळी जुलै-अॉगस्टमध्ये होणारे ऑलिम्पिकचे आयोजन ही एक समस्या आहे. या काळात भारत, इंग्लंड व आॕस्ट्रेलियन संघ व्यस्त असतात. त्यांनी याच काळात आॕलिम्पिक असल्याने अडचण येऊ शकते अशी शंका व्यक्त केली आहे.

दरम्यान, आयसीसीने सर्व सदस्य मंडळांना एक प्रश्नावली पाठवली आहे. त्यात क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये सहभाग झाला तर त्या मंडळांना सरकारकडून काय आर्थिक लाभ मिळू शकतो याची माहिती मागितली आहे. बीसीसीआयनेसुध्दा क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाबाबत राज्य संघटनांना आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे,आणि याबाबत बीसीसीआयच्या 24 डिसेंबरला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेतही याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER