क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानले बीसीसीआय व टीम इंडियाचे जाहीर आभार

cricket

कोरोनाचे सावट असताना गेली दोन महिने जगभरातील कोट्यवधी क्रिकेटप्रेमींची मने जिंकणारे आणि लोकांना क्रिकेटशी जोडून ठेवणारे अतिशय रंगतदार, तेवढेच संस्मरणीय क्रिकेट खेळून चिंतित लोकांना आनंदाचे क्षण देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघ (Team India) व भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket AustralIa) एका खुल्या पत्राद्वारे जाहीर धन्यवाद दिले आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चेअरमन अर्ल हेडिंग्ज व अंतरिम सीईओ नीक हाॕकले यांच्या स्वाक्षरीनिशी हे आभारपत्र जारी करण्यात आले आहे. त्यात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलेय की, बीसीसीआयने दाखवलेली मैत्री, विश्वास आणि त्यांनी पाळलेला शब्द यासाठी आम्ही सदैव त्यांचे आभारी राहू. त्यांच्या या सहकार्यामुळेच जगभरात कोट्यवधी लोकांना आनंद मिळवून देणारी ही मालिका खेळता आली.

वास्तविक ही मालिका खेळताना कोरोना महामारीमुळे आरोग्य व परिवहनाची फार मोठी आव्हानं होती तरी त्या सर्वांवर मात करत क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत संस्मरणीय मालिकांपैकी एक मालिका बघायला मिळाली. बीसीसीआयने आम्हाला सहकार्य करून या खेळाचे ते खऱ्या अर्थाने सर्वांत मोठे अँबेसेडर असल्याचे दाखवून दिले आहे. या मालिकेत बुमरा व कमिन्सची भेदक जलद गोलंदाजी, रहाणे व स्मिथची दमदार फलंदाजी, शुभमान गील व कॅमेरॉन ग्रीन यांचे लक्षात राहणारे पदार्पण अशा बऱ्याच संस्मरणीय गोष्टी घडल्या आणि गेली दोन महिने अतिशय रंगतदार खेळ आपण पाहिला. यासाठी बीसीसीआयला कराव्या लागलेल्या तडजोडी आणि त्यांनी त्यागलेल्या बऱ्याच गोष्टींची आम्हाला कल्पना आहे.

या यशस्वी मालिकेसाठी स्थानिक सरकारे, आरोग्य अधिकारी, आयोजक मैदाने, समालोचक, प्रायोजक, संघटना, खेळाडू, अधिकारी, कर्मचारी आणि या सर्वांचे कुटुंबीय यांचे आम्ही धन्यवाद मानायलाच हवेत. टीम इंडियाने ज्या प्रकारे या सामन्यांमध्ये संघर्ष केला आणि उसळी मारली, जो नीडर खेळ केला त्याची येणारी कित्येक वर्षे चर्चा होत राहील. या संपूर्ण दौऱ्यात ऑस्ट्रेलियन संघ, त्यांचे प्रशंसक आणि अधिकाऱ्यांचे वर्तन पाहता क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे हे खुले आभाराचे पत्र म्हणजे आश्चर्याचा धक्काच आहे.

कारण या मालिकेत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सातत्याने भारतीय खेळाडूंबद्दल शिवराळ भाषा वापरली, डिवचण्याचे काम केले, त्यांच्या गोलंदाजांनी बॅट व स्टम्पपेक्षा शरीरवेधी गोलंदाजीला महत्त्व दिले, त्यांच्या प्रेक्षकांनी भारतीय खेळाडूंना विशेषत: मोहम्मद सिराजला रंगभेदी शिवीगाळ करत त्याचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न केला, भारतीय संघातील खेळाडूंच्या मेलबोर्न येथे रेस्टॉरंट भेटीचेही असेच विनाकारण वादळ उठविण्यात आले, या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हे जाहीर आभार मानून आश्चर्यचकितच केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER