खेळ आणि जातियवादाच्या क्रिकेट इतिहासातील ‘या’ घटना माहित आहेत का?

वसिम जाफर (Wasim Jaffer) आणि उत्तराखंड (Uttarakhand) क्रिकेट संघटनेच्या आरोप प्रत्यारोपांच्या वादाने खेळांत, विशेषतः भारतीय क्रीडा क्षेत्रात, जातीयवादाचे (Communalism) जे चित्र आजपर्यंत क्वचितच बघायला मिळाले नाही तो नकोसा वाद समोर आला आहे. मुळात खेळांची दुनिया हे एकच क्षेत्र आहे ज्यात जातीयवादाला थारा नाही आणि सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व वर्ण आणि सर्व थरातील खेळाडू सोबत एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून खेळत असतात. सोबत राहात असतात.

खेळांच्या मैदानावर हा हिंदू, तो मुस्लीम, तो ख्रिश्चन असा भेद कधीच केला जात नाही. फक्त खेळ आणि खेळाडू एवढेच असते. याला काही अपवाद नक्कीच आहेत पण ते फक्त अपवादापुरतेच आहे. त्यामुळेच मध्यंतरी एका नेत्याने खेळांतही आरक्षणाचा जेंव्हा मुद्दा मांडला होता तेंव्हा तो विनोदाचा विषय ठरला होता.

या पार्श्वभूमीवर जेंव्हा उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव महिम वर्मा (Mahim Verma) यांनी जेंव्हा वसिम जाफरसारख्या खेळाडूवर जातीयवादाचे आणि जातीय आधारावर पक्षपाताचे आरोप केले तेंव्हा ते एकटे पडले आणि क्रिकेट जगत भक्कमपणे वसिम जाफरच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे.

यात मुळात दोन- तीन गोष्टी आहेत. एकतर वसिम जाफर हा असा खेळाडू आहे ज्याने आपल्या दीर्घ कारकिर्दीत केवळ आणि केवळ प्रतिष्ठाच कमावली आहे. तो कधीही, कोणत्याही विवादात अडकलेला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे उत्तराखंडने गेल्या तीन वर्षात दोन प्रशिक्षक बदलल्याचा इतिहास आहे. त्यामुळे जर प्रशिक्षक सोडून जात असतील तर नक्कीच तिकडे काहीतरी संघटनात्मक समस्या आहे. हा विचार करता वसिम जाफरने जो पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाचा आरोप केलाय त्यात तथ्य दिसतेय. उलटपक्षी उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचीव महिम वर्मा यांनी जे जातीयवादाचे आरोप केले आहेत त्याची पुष्टी करणारे कुणीच समोर आलेले नाहीत.

भारतीय क्रिकेटच्या, किंवा भारतीय खेळांच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदाच असा एखाद्या खेळाडूवर जातीयवादाचा आरोप झाला आहे. इतिहासात डोकावले तर स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईत खेळल्या जाणाऱ्या चौरंगी व पंचरंगी स्पर्धा जातीय आधारावर होत होत्या. त्यात युरोपियन्स, हिंदू, मोहम्मेडन्स, पारशी आणि इतर असे संघ खेळायचे आणि गांधीजींनी जातीय आधारावरील संघांच्या या स्पर्धेवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्या स्पर्धा बंद पडल्या होत्या. त्या सुरुवातीच्या काळामध्येच बाळू पलवलकर नावाच्या दलित खेळाडूलासुध्दा जातीयवादाचा सामना करावा लागला होता.

तिकडे आॕस्ट्रेलियात सर डाॕन ब्रॕडमन आणि जॕक फिंगल्टन व बील ओरेली यांच्यात प्रोटेस्टंट व कॕथाॕलीक ख्रिश्चन असा संघर्ष ही बघायला मिळाला होता. पाकिस्तानात क्रिकेटपटू दानिश कानेरियालासुध्दा हिंदू असल्याचा फटका बसला होता. त्याला इतर खेळाडूंकडून वारंवार भेदभावाचा सामना करावा लागला होता पण संघ निवड आणि खेळाडूंना सामने खेळविण्यावरुन जातीय भेदभाव केल्याचा आणि विशिष्ट जमातीच्या खेळाडूंना प्राधान्य दिल्याचे आरोप पहिल्यांदाच झाले आहे. आणि म्हणूनच गेल्या दोन वर्षात कोरोनासह नको नको त्या गोष्टी होताहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER