अपरिपक्वता की श्रेयवाद? लॉकडाऊनच्या संभ्रमावरुन फडणवीसांचे सरकारला पाच प्रश्न

मुंबई : राज्यातील लॉकडाऊन (Lockdown) संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु तासभरातच राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत. नवी नियमावली अद्याप विचाराधीन आहे. राज्यात लॉकडाऊन सुरुच असेल, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलं. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे विविध सवाल उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली आहे. काय सुरू, काय बंद?, कुठे आणि केव्हापर्यंत?, लॉक की अनलॉक?,पत्रपरिषद की प्रेसरिलीज?, अपरिपक्वता की श्रेयवाद?, असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत.

दुसरीकडे गिरीश महाजन यांनीही ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कोणताही समन्वय दिसून येत नाही. तीन पक्षात नाही तर एक-एका पक्षातील नेत्यांमध्येही समन्वय दिसत नाही. सरकारमध्ये फक्त श्रेयवादाची लढाई सुरु आहे. आधी निर्णय जाहीर करण्याची घाई करायची. मग मुख्यमंत्री कार्यालयानं त्यावर स्पष्टीकरण द्यायचं. काल मुंबईत रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला परवानगी म्हणून दुकानदारांमध्ये संभ्रम निर्माण केला. लॉकडाऊन बाबत तत्त्वत: मान्यता असूच कशी शकते. हे सरकार भरकटलेले आहे. या संभ्रमामुळे जनता भरडली जात आहे, अशी टीका माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केलीय.

तुम्हाला एकमेकांशी बोलण्यासाठीही वेळ मिळत नाही का? सरकार म्हणून एकमतानं निर्णय घ्यायला हवा. माध्यमांसमोर येण्यासाठी चुकीचा निर्णय का सांगितला जातो. वडेट्टीवारांना सांगायचंच होतं तर त्यांनी आधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा का केली नाही? किंवा मुख्यमंत्र्यांनीही वडेट्टीवारांना नेमकं काय सांगायचं ते सांगितलं नाही का? तुम्हीच संभ्रमित असाल तर जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही का? असा प्रश्न प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला. राज्यातील शेतकरी, दुकानदार, व्यापारी यांच्यावर मोठं आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्या सगळ्यांचा विचार करुन सरकार म्हणून एकत्र निर्णय अपेक्षित आहे. पण सरकारमध्ये गोंधळाचं वातावरण दिसत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे नेते वेगवेगळं सांगत सुटतात. हा श्रेयवाद कशासाठी? असा प्रश्नही दरेकरांनी सरकारला विचारला.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले. मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो तसं काही नाही हो… हे सरकार आहे की सर्कस? ठाकरे सरकारची जत्रा, त्यात कारभारी सतरा, गोंधळी सरकार, अनलॉकवरुन गोंधळ. तथाकथित विचारी मुख्यमंत्र्यांना बहुदा मंत्रीच विचारत नाहीत अशी स्थिती असल्याची टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button