तृष्णा – लक्ष देणे गरजेचे !

तहान लागली की पाणी प्रत्येकजण पितो. तसे ते प्यायलाच हवे कारण तहान लागल्यावरही पाणी न पिण्याने अनेक त्रास होतात. परंतु वारंवार तहान लागणे प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याची इच्छा होणे हा एक विकार आहे, त्याला तृष्णा विकार म्हणतात. वाचून आश्चर्य वाटले ना ? वारंवार तहान लागणे हा देखील आजार ?

वारंवार तोंड शुष्क होणे, पाणी पिल्यानंतरही तृप्ति न होणे, जेवण करण्याची इच्छा न होणे, आवाज बसणे ही लक्षणे उत्पन्न करणारा हा तृष्णा विकार. गेल्या काही वर्षात भरपूर पाणी प्या असा सल्ला दिला जातो. परंतु बाहेरच्या देशातील वातावरण अतिशय थंड असल्यामुळे घाम अत्यल्प येत असल्यामुळे तेथील लोकांना पाणी पिण्याची इच्छा होत नाही त्यामुळे आवश्यक प्रमाणातही ते लोकं पाणी पित नाही म्हणून जास्त पाणी प्या असे सांगावे लागते.

आपल्या देशात वातावरण वेगळे आहे. उष्ण हवामान असल्याने तहान लागते व पाणी स्वाभाविकच प्यायले जाते. पाश्चात्य देशात पाणी न पिण्याने व्याधी होतात तर आपल्याकडे अति पाणी पिण्याने. आयुर्वेदात तहान लागल्यावर घूट घूट पाणी पिण्यास सांगितले आहे. फक्त ग्रीष्म ( उन्हाळा) शरद ऋतु ( अश्विन कार्तिक) या काळात उष्णता जास्त असते म्हणून स्वाभाविकच पाणी जास्त प्यावेसे वाटते. म्हणूनच इच्छेनुसार पाणी प्यावे.

वारंवार तहान लागण्याची कारणे काय ते बघूया –

खारट आंबट तिखट पदार्थ जास्त खाणे. टाकणखार, पापड तळलेले पदार्थाच्या सेवनानंतरकोरडे अन्न खाणे आजारानंतरचा आलेला क्षय, कृशता अतिसार, वांती यासारखे व्याधी झाल्यास उन्हात फार वेळ राहिल्याने, रात्री जागरण होऊन पित्त वाढल्यास. शोक क्रोध भय असे मनोविकार उपवास, अतिव्यायाम परिश्रमाची कामे. गोड जड पदार्थ जास्त खाल्याने. अति मद्यपान अशी विविध कारणे अति तहानेची आहेत.

बरं तृष्णा विकारात नुसते पाणी पिऊन बरे वाटत नाही. उलट पोट डब्ब भरल्या प्रमाणे वाटते. पण घसा कोरडाच वाटतो. म्हणूनच कारणे शोधून त्या प्रमाणे उपाय योजना आवश्यक ठरते. रात्री जागरणाने पित्त वाढून वारंवार तहान लागत असेल तर काहीही औषध न घेता झोप घेतली की बरे वाटते. मध पाणी, धण्याचे पाणी घेतल्यास बरे वाटते. कोकम सरबत, मनुकेचे पाणी, उसाचा रस, जेष्ठमध चघळणे हे तहान शमविण्याकरीता उपयोगी ठरतात. एकदम जास्त प्रमाणात पाणी न पिता एकावेळी थोडे थोडे पाणी प्यावे.

पाणी पिण्याचे मोजमाप वजन करणे थोडे कठीणच. वय, देश, प्रकृति, ऋतु यावर पाणी पिण्याचे प्रमाण बदलते. तहान लागली की नक्कीच पाणी प्यावे. पण वारंवार तहान लागत असेल आणि पाणी पिऊनही समाधान तृप्तता होत नसेल तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER