गोरक्षेच्या नावावर देशभरात सुरु आहे गुंडगिरी – असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली: राजस्थानच्या अलवरमध्ये गो तस्करीच्या आरोपावरून झालेल्या मुस्लिम युवकाच्या हत्येवर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला आहे. या युवकाचे नाव पेहलू खान असे आहे. गोरक्षेच्या नावावर देशभरात गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप ओवैसी यांनी केला असून अश्या प्रकारची सहावी घटना असल्याचे ते म्हणाले.

सोमवारी गो तस्करीच्या आरोपाखाली सुमारे १५ संशयितांना गोरक्षकांनी मारहाण केली होती. यामध्येच सदर ३५ वर्षीय युवकालाही मारहाण करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. अलवरचे जिल्हाधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक अलवर महामार्गावर सहा गाड्यांमध्ये गायींची तस्करी करत होते. त्यावेळी गोरक्षकांची नजर त्यांच्यावर पडली. गाय घेऊन जाणाऱ्यांमध्ये १५ लोकांचा समावेश होता. बहरोर ठाण्याचे कॉन्स्टेबल वीरेंद्र सिंह यांच्या मते, यातील काहींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. हे सर्व हरियाणातील नूह जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे बोलले जाते.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये अवैध कत्तलखाने आणि गो तस्करीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्यानंतर ओवेसी यांनी भाजप पाखंडी असून उत्तर प्रदेशमध्ये त्यांना गाय ही ‘मम्मी’ असून ईशान्य भारतात त्यांना ती ‘यम्मी’ असल्याचे म्हटले होते. उत्तर प्रदेशची धुरा हाती घेतल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांना गो-तस्करी वर पूर्णपणे बंदी घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर यूपीत सातत्याने अवैध कत्तलखान्यांवर कारवाई होताना दिसत आहे.