
काही दिवसांपूर्वी पुण्यात रानगवा शिरला होता. गवा बघायला माणसांच्या झुंडीच्या झुंडी जमू लागल्या आणि इतकी बेशिस्त माणसांची गर्दी, त्यांच्या हातातले कँमेरे, त्यातून सोशल मिडियावरून व्हायरल झालेला गवा अखेर सहा साडेसहा तासांच्या पळापळीनं दमून त्याला प्राण गमवावा लागला. या घटनेला महिना होत आला नाही तो मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातल्या चार काळविटांचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे.
या आणि अशा कोणत्याही विषयांवर विचार करताना आणि त्यावर उपाय शोधताना तर्क, विज्ञान याबरोबरच व्यावहारिकता हा एक मोठा आणि महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे रानगवा मानवी वस्तीत शिरल्यानंतर लोकांनी काय करायला हवं, याविषयीचं ज्ञान माहिती लोकांना दिली जाणं गरजेचं आहे. तसंच, यापुढच्या काळात गवा किंवा बिबट्या असे प्राणी मानवी वस्तीत शिरण्याचे प्रकारही पुन्हा पुन्हा घडणार आहेत, हे लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचीही गरज आहे. पुण्यातल्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात ३४ काळविटे होती आणि अचानक मोकाट कुत्री संग्रहालयात घुसल्यानंतर घाबरून चार काळविटांचा मृत्यू ओढवला आहे. ती चारही काळविटे घाबरल्याने हृदयक्रिया बंद पडून मृत्युमुखी पडली आहेत, असंही लक्षात आलं आहे. त्यामुळे प्राण्यांसाठी राखीव क्षेत्रं असलेल्या प्राणिसंग्रहालयात मोकाट कुत्री घुसू नयेत, ही अपेक्षा असते तसेच प्राण्यांसाठीच्या अधिवासात म्हणजेच त्यांच्या नैसर्गिक हँबिटाटमधे प्राण्यांच्या हक्काच्या जंगलामधे मानवाने अधिक्षेप करू नये, ही अपेक्षा बरोबरच आहे.
मानवी वस्ती वाढत चाललीय ती लोकसंख्येच्या वाढीमुळे. त्यातून महाराष्ट्रात शहरीकरण पन्नास टक्क्यांवर पोहोचू लागलंय. त्यामुळे शहरांची हद्द जसजशी विस्तारित होत जात आहे तसतशी प्राणिसंग्रहालये शहरापासून दूर नेण्याचीही गरज आहे. पुण्यामधे काही वर्षांपूर्वी शहराच्या मध्यभागात सारसबागेशेजारीच असलेले प्राणिसंग्रहालय गावाबाहेर कात्रज भागात हलवण्यात आले पण आता पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने २३ गावं समाविष्ट केली जात असताना पुणे शहराच्या दक्षिण भागात प्राणिसंग्रहालयाच्याही पलीकडच्या भागात असलेली गावं महापालिका हद्दीत समाविष्ट होत आहेत. त्यामुळे शहर नियोजनाबद्दलच नव्यानं विचार व्हायला हवा. त्याबरोबरच वेगाने लोकसंख्यावाढ हत असलेल्या पुण्यासारख्या महानगरांच्या नियोजनाचा तर पुढची पन्नास वर्षे लक्षात घेऊन विचार व्हायला हवा.
शहरात उद्भवलेल्या पूरस्थितीच्या वेळी प्राणिसंग्रहालयाची कात्रज तलावाच्या बाजूची सीमाभिंत काहीशी पडली होती. त्यामुळे मोकाट कुत्र्यांनी काळविटांसाठी असलेल्या राखीव क्षेत्रात प्रवेश केला. घाबरलेल्या चार काळविटांचा भीती आणि पळाल्याने आलेला ताण, श्रम यातून मृत्यू ओढवला असं प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. शहरं वाढत असताना जंगलातले प्राणी शहरात येणं अपरिहार्य आहे पण पुरानंतर सीमाभिंतीची डागडुजी त्वरित करून ती पुन्हा बांधता आली असती आणि हा प्रकारच घडला नसता. त्यमुळे कुत्री काळविटांच्या क्षेत्रात घुसली या गोष्टीला जबाबदार असलेल्या सर्वांवरच कारवाई व्हायला हवी. काळविटांच्या मृत्यूनंतर रखवालदारांची संख्या वाढवावी, या मागणीला अर्थ नाही. प्राणिसंग्रहालयाच्या बाहेरच्या खाद्यपदार्थ स्टॉल्समुळे मोकाट कुत्री येतात, या कारणानं आता काही काळापुरती स्टॉल्सवरही कारवाई केली जाईल. पण चौकशी, कारवाई या सगळ्या गोष्टी मलमपट्टीसारख्या न करता गवा नागरी वस्तीत घुसण्याचा प्रकार असो की कुत्र्यांमुळे काळविटांचा मृत्यू असो, या सर्व गोष्टींबद्दल दीर्घकालीन कायमस्वरूपी उपाययोजना करायची गरज आहे.
कायद्याची कडक अंमलबजावणी, नागरिकांचे प्रबोधन, शहरांचे दीर्घकालीन विचारातून नियोजन, महापालिका असो की ग्रामपंचायत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना विकेंद्रित पद्धतीने आमच्या गावात आम्ही सरकार, असा कारभार करण्याची मुभा हे सारं प्रत्यक्षात आलं तर काळविटांचा मृत्यू पुन्हा होणार नाही. गवा नागरी वस्तीत बिथरणार नाही, मोकाट कुत्री काळविटांच्या क्षेत्रात जाणार नाहीत आणि हे सारं नव्या वर्षाचे संकल्प नाहीत तर अपेक्षा आहेत. त्या पुऱ्या करण्याची क्षमता किमान पुढच्या पिढीत तरी येवो.
शैलेन्द्र परांजपे
Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला