‘कोवोवॅक्स’ नावाची आणखी एक लस सप्टेंबरमध्ये बाजारात येणार!

Adar Poonawalla - COVOVAX - Maharashtra Today

पुणे :- सप्टेंबर २०२१ पर्यंत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) निर्मिती केलेली आणखी एक कोरोना (Corona) प्रतिबंधक लस भारतीय बाजारपेठेत येणार असल्याची शक्यता आहे. या नव्या लसचे ‘कोवोवॅक्स’ (Covovax) असे नाव आहे. सध्या भारतात अ‍ॅस्ट्राझेंका आणि सीरम यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेली ‘कोविशिल्ड’ ही एक कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. तसेच हैदराबादच्या भारत बायोटेक कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मदतीने तयार केलेली ‘कोवॅक्सिन’ ही दुसरी प्रतिबंधक लस आहे. ‘कोवोवॅक्स’ उपलब्ध झाल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसची संख्या तीन होईल.

अमेरिकेतील ‘नोवावॅक्स’ इंक आणि सीरम संयुक्तपणे ‘कोवोवॅक्स’ या लसीची निर्मिती करत आहेत. या लसीची निर्मिती पुण्यातील सीरमच्या फॅक्टरीत होणार आहे. सध्या ‘कोवोवॅक्स’ या लसची भारतात चाचणी सुरू आहे. प्रयोग यशस्वी झाल्यास सप्टेंबर २०२१ पासून लसची निर्मिती करून ती भारतीय बाजारात आणली जाईल.

‘कोवोवॅक्स’ या लसचे आफ्रिकेत आणि इंग्लंडमध्ये झालेले प्रयोग ८९ टक्के यशस्वी झाले. आधी लस जून २०२१ पर्यंत आणण्याचे नियोजन होते. मात्र प्रयोगांना वेळ लागत असल्यामुळे निर्मितीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले. आता सप्टेंबर २०२१ पर्यंत ‘कोवोवॅक्स’ची निर्मिती सुरू करून ही लस बाजारात उपलब्ध होईल.

भारतासह निवडक देशांमध्ये ‘कोवोवॅक्स’च्या विक्रीची जबाबदारी सीरम सांभाळेल, तर आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेल्या देशांमध्ये ‘कोवोवॅक्स’च्या विक्रीची जबाबदारी अमेरिकेतील ‘नोवावॅक्स’ इंक ही कंपनी सांभाळणार आहे.

५ कोटी ६९ लाखांहून जास्त नागरिकांचे लसीकरण
भारतात ५ कोटी ६९ लाख ५७ हजार ६१२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस देण्यात आला आहे. देशात १६ जानेवारी २०२१ पासून ‘कोविशिल्ड’ आणि ‘कोवॅक्सिन’ या दोन लसच्या माध्यमातून लसीकरण सुरू आहे. कोरोनाची नवी लाट येत असल्यने देशभरात लसीकरणाचा वेग वाढवण्याची तयारी सुरू आहे. केंद्र सरकार मर्यादित काळासाठी कोरोना लशीची निर्यात थांबविण्याचा विचार करीत आहे. जास्तीत जास्त डोस भारतीयांसाठी उपलब्ध करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याबाबत सरकार गंभीर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER