आनंदाची बातमी : भारतात फेब्रुवारीपासून ५०० ते ६०० रुपयांत कोविशिल्डचे वितरण

Adar Poonawala

नवी दिल्ली : आजही लोकांच्या मनात कोरोनाची धास्ती कायम आहे. देशात हळूहळू अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. मात्र कोरोनाचं संकट टळलं नाही. यातच कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला यांनी गुरुवारी जनतेला आनंदाची बातमी दिली आहे. ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केलेली ‘कोविशिल्ड’ ही लस फेब्रुवारी महिन्यात भारतात वितरित व्हायला सुरुवात होईल. या लसीची किंमत ५०० ते ६०० रुपये इतकी असेल, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली आहे.

त्यामुळे कोरोनाच्या संकटामुळे तणावाखाली असलेल्या भारतीयांना खूप मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अदर पूनावाला यांनी एका वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. सीरम इन्स्टिट्यूटकडून पुढच्या महिन्यात केंद्र सरकारकडे ‘ कोविशिल्ड’च्या तातडीच्या मंजुरीसाठी अर्ज करण्यात येईल. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्यसेवक आणि ज्येष्ठ लोकांना ही लस देण्याला प्राधान्य दिले जाईल. तर सामान्य जनतेसाठी मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून ही लस उपलब्ध होईल. ही लस साठवून ठेवण्यासाठी 2°C ते 8°C अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. तर या लसीच्या एका डोसची किंमत ५०० ते ६०० रुपये असेल, अशी माहिती अदर पूनावाला यांनी दिली. मात्र, केंद्र सरकार या लसीची मोठ्या प्रमाणावर खरेदी करणार आहे.

त्यामुळे त्यांच्यासाठी या लसीची किंमत २२५ ते ३०० रुपये इतकी असेल, असेही पूनावाला यांनी सांगितले. त्याचसोबत कोरोना लसीचे दोन  डोस जनतेला परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे. या दोन  डोसची किंमत एक हजार रुपये असेल. आतापर्यंत घेतलेल्या चाचणीचे अहवाल सकारात्मक आले असून आता अंतिम चाचणीच्या अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. तर २०२४ पर्यंत संपूर्ण भारतातील नागरिकांना लसीकरण केलं जाईल. भारतातील प्रत्येक व्यक्तीला लस टोचण्यासाठी दोन-तीन वर्षे  लागू शकतात, असा अंदाज अदर पूनावाला यांनी वर्तविला.

दरम्यान,  ‘कोविशिल्ड’  लस भारतात उपलब्ध झाल्यानंतर देशभरात तिचे वितरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून तयारी सुरू  झाली आहे. त्यासाठी सध्या देशभरात ‘कोल्ड चेन स्टोरेज’ची यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. भारतीय हवाई वाहतूक आणि विमानतळ व्यवस्थापनेने याबाबतचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. लसीचे कोट्यवधी डोस संपूर्ण देशात पोहचविण्यासाठी ‘कोल्ड चेन स्टोरेज’ व्यवस्था निर्माण केली जात आहे.

विमानतळांवर कार्गो युनिट्स तैनात करण्यात आले आहेत. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर ग्रुपने दोन्ही ठिकाणी ‘कूलिंग चेंबर्स’ उभारले आहेत. याशिवाय इतर काही विमानतळांवर आणि हवाई वाहतूक कंपन्यांनी लसीच्या वाहतुकीची तयारी सुरू केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER