‘जम्बो हॉस्पिटल’ऐवजी छोट्या रुग्णालयांवर भर द्या : फडणवीसांची नागपूर मनपा अधिकाऱ्यांना सूचना

Devendra Fadnavis

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शहरातील कोरोना स्थितीचा (Corona crises) आढावा घेतला. या पार्श्वभूमीवर त्यांनी कोरोना रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल महापौर आणि आयुक्तांशी चर्चा केली .

शहरात ‘जम्बो हॉस्पिटल’ (Jumbo Hospital) ऐवजी छोट्या रुग्णालयांवर भर द्यायला हवा, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली. ‘जम्बो हॉस्पिटल’ उभारण्याऐवजी २०० ते ३०० खाटांची छोटी रुग्णालये उभारा. एकाच वेळी एक हजार किंवा त्यापेक्षा जास्त खाटांच्या ‘जम्बो हॉस्पिटल’मध्ये व्यवस्थापन करण्यात अनेक अडचणी येतात. रुग्णांना उत्तम सुविधा मिळावी, रुग्ण तसेच वैद्यकीय चमूंचे कार्य सुरळीत चालावे यासाठी छोटी रुग्णालये जास्त चांगली ठरतील, असे ते म्हणाले.

शहरातील ४२ खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. इतरही रुग्णालयांमध्ये सेवा सुरू करण्याबाबत प्रयत्न सुरू आहे. शहरात दररोज ६५०० ते ७००  कोविड चाचण्या केल्या जात आहेत. सदर येथील रुग्णालयात कोविड उपचार केले जातील. याशिवाय इंदिरा गांधी रुग्णालयातही उपचार सुरू करण्यात आले आहेत. पाचपावली रुग्णालयात कोविड पॉझिटिव्ह गरोदर मातांवर उपचार व त्यांची प्रसूती सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली .

दरम्यान महापालिका मुख्यालयातील आयुक्त कक्षात झालेल्या या बैठकीत त्यांच्यासमवेत महापौर संदीप जोशी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार गिरीश व्यास, नागो गाणार, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, उपमहापौर मनीषा कोठे आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER