
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील कोविड-१९ या विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्याकरिता यावर संशोधन होणे गरजेचे असल्याने या संशोधन कार्यात हे ‘कोविड-१९ संशोधन केंद्र’ नक्कीच मोलाचे काम करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात कोविड-१९ संशोधन केंद्राला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी भेट देऊन इमारतीची पाहणी केली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डीएनए बारकोडिंगचे संचालक डॉ.जी.एस.खेडकर आदींची उपस्थिती होती.
एमआयडीसीतील ऑरीक सिटी यांच्यामार्फत सीएसआर फंडातून हा १ कोटी २३ लाख रुपयांचा निधी संचालक मंडळाकडून मंजूर करून कोविड संशोधन केंद्र तातडीने उभे केल्याबद्दल समाधान व्यक्त करत देसाई म्हणाले की, भविष्यातील कोविड-१९ चा प्रसार रोखण्याकरिता हे संशोधन केंद्र काम करणार असून या कोरोना युद्धात अनेक कोरोनायोद्धे जसे की, डॉक्टर, पोलीस आणि नर्स हे जीवावर उदार होऊन प्रतिकूल परिस्थितीत काम करीत आहे. या कोरोना योद्ध्यांना काम करत असताना विषाणूचा संसर्ग होतो.
तेव्हा आपण हा संसर्ग कसा होतो? आणि त्याचा प्रसार होण्यास कसा अटकाव करता येईल याकरिता या संशोधन केंद्रात संशोधन करून संशोधन केंद्राच्या माध्यमातून अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने लवकरात लवकर संशोधन केंद्राचे काम सुरू करण्याचे निर्देशही संबंधितांना यावेळी देसाई यांनी दिले. सुरुवातीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी संशोधन केंद्राच्या इमारतीविषयी माहिती सांगितली.
ते म्हणाले की, कोविड-१९ विषाणूच्या संशोधनाकरिता हे केंद्र राज्यातील तिसरे केंद्र असून या संशोधन केंद्रात सध्या २३ कर्मचारी असून येथे दररोज एक हजार स्वॅब तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. तसेच येथील मशीनरी अधिक अद्ययावत करण्याकरितादेखील प्रयत्न चालू आहे. तसेच उस्मानाबाद येथे चौथ्या संशोधन केंद्राचे काम प्रगतिपथावर असून त्याकरिता सीएसआर फंडातून निधीदेखील मिळाला आहे. आवश्यक साधनसामग्री लवकरच उपलब्ध करून तेथेही काम सुरू होणार आहे. यावेळी कुलगुरू डॉ.येवले यांनी पालकमंत्री देसाई यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ३५ लाख रुपये व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीतील एकूण रक्कम ९ लाख २६ हजार १०० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला