‘दिल्लीतच नाही, तर संपूर्ण देशात करोना लस मोफत मिळणार’, केंद्रीय आरोग्यमंत्र्याची मोठी घोषणा

Union Health Minister

नवी दिल्ली :- नववर्षाच्या सुरूवातीलाच केंद्र सरकारनं देशवासियांना दिलासादायक घोषणा केली आहे. देशात हळूहळ करोना लसींना मान्यता दिली जात असताना ती निशुल्क असणार की पैसे मोजावे लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्याचं उत्तर अखेर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr. Harsh Vardhan) यांनी दिलं आहे. देशभरात ड्राय रन सुरू असतानाच केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी (Union Health Minister) ही घोषणा केली आहे.

कोरोना लसीचं कोणत्याही क्षणी वितरण केलं जाण्याची शक्यता असल्याने संपूर्ण देशभरात टिकाकरणाचे ड्राय रन घेतले जात आहे. दिल्लीतही या ड्राय रनचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन गुरु तेग बहादूर सिंग रुग्णालयात आले होते. यावेळी त्यांना कोरोनाची लस दिल्लीतील जनतेलाच मोफत मिळणार आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर केवळ दिल्लीतच नव्हे तर संपूर्ण भारतातील जनतेला ही लस मोफत देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व्हॅक्सीन सुरक्षित ठेवण्यावर आमचा भर आहे. पोलिओ लसीकरणाच्यावेळी अनेक प्रकारच्या अफवा पसरल्या होत्या. तरीही लोकांनी लस टोचून घेतली आणि भारत पोलिओमुक्त झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. देशाला लसीकरणाचा अनुभव आहे. कोरोनाची लस जनतेच्या सुरक्षेसाठी आहे. त्यामुळे कोणत्याही चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असंही त्यांनी सांगितलं.

ही बातमी पण वाचा : कोरोना लसीच्या ‘ड्राय रन’ला सुरूवात; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER